Tuesday 2 October 2018

तपासा, तपासा आणि तपासाच!


तपासा तपासा आणि तपासाच
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.


आपलं मूल नाकीडोळी नीटस असावं, बुद्धीने चलाख असावं, वागण्यात चुणचुणीत असावं असं कोणत्या आई बापांना वाटत नाही? पण हे होण्यासाठी सहजी शक्य आणि  तुलनेने स्वस्त अशा कित्येक तपासण्या आजही वापराविना पडून आहेत. याला पालक जितके जबाबदार आहेत तितकेच डॉक्टरही जबाबदार आहेत. याबाबत जनजागृती आणि ‘जनक’जागृती करण्याची जबाबदारी डॉक्टरांवर आहे आणि कोणतेही किल्मिष मनात न ठेवता स्वतःला जागृत करून घ्यायची जबाबदारी पालकांची, कुटुंबियांची आहे.

लोकसंख्येच्या  प्रश्नाला  आपण बऱ्यापैकी  वेसण घातली आहे. आता प्रश्न लोकांच्या संख्येचा नसून त्यांच्या गुणवत्तेचा आहे. जी काय एक-दोन लेकरे  निपजतील ती अधिकाधिक निर्दोष, निर्मळ, आणि सकस कशी निपजतील हे पहाणे महत्वाचे झाले आहे. मुले ही भविष्यातील गुंतवणूक तेंव्हा ही गुंतवणूक अत्यंत किफायतशीर व्हावी असा विचार असणं योग्यच आहे.


मुलांची संख्या समाजानी अत्यंत मर्यादित केली आहे. ‘हम दो हमारे दो’ हा सरकारी सल्ला कित्येकांनी अगदी मनाला लावून घेतलाय. कित्येक तर एकावरच थांबणारे आहेत. जे पदरात पडले त्याचेच उत्तम लालन, पालन, पोषण, शिक्षण, करून त्याच्या पंखांना बळ देऊ असा अगदी व्यावहारिक विचार त्यामागे असतो. भारत मातेच्या भल्यासाठी कोणी मूल टाळत  नाही. एखादच जरी झालं तरी ते आपल्याला आधार लागेल तोपर्यंत जगेल, अशी जबर शक्यता असते म्हणून लोकं कुटुंब मर्यादित राखतात. सुधारलेल्या आरोग्यव्यवस्थेमुळे सुधारलेले आयुर्मान आणि सुधारलेल्या अर्थव्यवस्थेमुळे सुधारलेले जीवनमान कुटुंब नियोजनाच्या यशामागची मुख्य कारणे आहेत.


मुळात मुलं कमी त्यामुळे झालेल्या बाळाचं कौतुक काय वर्णावं? कुणी तळहाताचा पाळणा केलेला तर कुणी सोन्याचा, मग त्याला रेशमाची दोरी, मखमली गादी, जरीची गिरदी, वेलबुट्टी कुंची, सोन्याची साखळी, रुप्याचा वाळा, तीट लावले तान्ह्या बाळा! पण ह्या सगळ्या वर्णनात केंद्रस्थानी जे सुदृढ, गुटगुटीत बाळ ते मात्र सगळ्यांनाच लाभते असं नाही.
पण आजही भारतात दरवर्षी आठ लाख सव्यंग मुले जन्मतात त्यात  ‘जीसिक्सपीडी’नी ग्रस्त अशी साडेतीन लाख बाळे, चयापचयाच्या व्याधींनी ग्रस्त (Inborn Errors of Metabolism) अशी पंचवीस हजार बाळे, ‘डाउन्स सिंड्रोम’वाली वीस हजार मंदबुद्धी बाळे, जन्मत: थायरॉईडची कमतरता असल्याने मतीमंद झालेली पंधरा हजार, ‘थॅलेसेमिया’वाली चौदा हजार आणि ‘सिकल सेल’वाली पाच हजार बाळे जन्माला येतात.
पण हे असंच व्हायला पाहिजे असं अजीबात नाही. ह्यातले काही आजार पूर्णतः  टाळता येतात, काही अंशतः, तर काहींचे दुष्परिणाम टाळता येतात. पण कधी? जर तपासण्या करून तसे वेळेत निदान केले तर. पण आपल्याकडे एकुणात तपासण्या न करण्याकडे कल. जाऊ दे नशिबात असेल ते होईल, ही वृत्ती. गरिबीला, अज्ञानाला, अशिक्षितांना लघुदृष्टीचा शाप असतोच. आला दिवस ढकलायचा असे त्यांचे धोरण बनत जातं. आपोआपच. दीर्घकालीन फायद्या-तोट्याचा विचार त्यांना शिवतच नाही आणि शिवला तर परवडतही नाही. पण आश्चर्य म्हणजे शिकले सवरलेले, खात्यापित्या घरचे लोकही असं वागतात. सांगून सुचवूनही जाम तपासण्या करत नाहीत.
आज इथे यातल्या काही महत्वाच्या आजारांबद्दल बोलणार आहोत. (थॅलेसेमिया आणि सिकल सेल अॅनिमिया या दोन आजारांच्या तपासण्याबाबत मी याच सदरात, ‘चुकवू नये असे काही’ असा लेख लिहीला होता.)
तपासता तर काय बरेच काही येतं. म्हणून तपासता येईल तो हरएक आजार तपासायचा हे धोरण योग्य नाही. यात वारेमाप खर्च होईल आणि हाताशी क्वचितच काही लागेल. त्यामुळे काय तपासायचं हे नीट ठरवावं लागतं. त्यासाठी काही निकष आहेत, हेच ते प्रसिद्ध विंडसर–युग्नर निकष.

·       त्या त्या ठिकाणी तो तो आजार बऱ्यापैकी प्रमाणात आढळायला हवा.
·       निदान झाले तर त्यावर उपचार उपलब्ध आहेत असेच आजार तपासणीसाठी निवडायला हवेत. नुसतंच निदान करून उपयोग काय?
·       जन्मतः उपचार करून विलक्षण फायदा होत असेल तर असे निदान करण्यात अर्थ आहे.
·       शिवाय निदान, उपचार आणि या साऱ्याचा खर्च याचं गुणोत्तर फायदेशीर हवं.

या निकषात बसणाऱ्या आणि म्हणून सर्वांनी आपल्या तान्हुल्यासाठी आवर्जून कराव्यात अशा किमान तीन तपासण्या आहेत.

·       थायरॉईड स्त्रावाची तपासणी (TSH),
·       ‘जीसिक्सपीडी’साठीची तपासणी आणि
·       ‘कन्जेनयटल अॅड्रीनल हायपरप्लासिया’साठीची
तपासणी ह्या सर्वांनी करून घ्याव्यात अशा आहेत, नव्हे तसा मुळी भारतीय बालरोगतज्ञ संघटनेचा (National Neonatology Forum) सांगावाच आहे. हे आजार बऱ्याच प्रमाणात आढळतात. जन्मतः मुळीच लक्षात येत नाहीत. यावर झटपट तपासणीही उपलब्ध आहे आणि उपचारही. तपासणी स्वस्त आहे. तीन्हींना मिळून सुमारे १०००/- रुपये फक्त.  शिवाय आहेत ते उपचारही स्वस्त आहेत, कुणालाही परवडण्यासारखे आहेत. मुख्य म्हणजे वेळेत निदान झालं नाही तर कधीही भरून येणार नाही असं नुकसान होतं. हे मी अलंकारिक भाषेत म्हणून लिहित नाहीये. हे शब्दशः  खरं आहे.

जन्मतः जर थायरॉईडचा स्त्राव कमी असेल तर त्या बाळाची वाढ खुंटते. ते कायमचं मतीमंद होतं (Cretinism). पण जन्मतः जर निदान झालं आणि उपचार सुरु केले, तर ते छान टवटवीत होतं. अगदी नॉर्मल होतं.

जन्मतः जर ‘कन्जेनायटल अॅड्रीनल हायपरप्लासिया’चे (CAH) निदान नाही केले तर आफतच. यातील काहीं बाळांना लवकरच शरीरातील क्षारसंतुलन बिघडल्यामुळे  जीवघेणे आजार उद्भवतात. काहींत मोठेपणी उंचीच वाढत नाही, काही मुलींत पाळी अनियमित येऊ लागते. काहीवेळा हा आजार गर्भावस्थेपासून आपले प्रताप दाखवायला सुरवात करतो. मग मुलीचा गर्भ असूनही कधी पुरुष सदृष बाह्यांग निर्माण होतं. ते मूल मुलगा की मुलगी हे ठरवणं मुश्कील होतं! ही तर वैद्यकीयच नाही तर कौटुंबिक आणि सामाजिक आपत्ती. डिलिव्हरी झाली असं कळताच पहिला प्रश्न येतो, ‘अरे वा, काय झालं, मुलगा की मुलगी?’ आता सांगणार काय?

जीसिक्सपीडी (Glucose 6 phospohate dehyadrogenase deficiency) यात मुळात या रसायनाची कमतरता असल्याने नेहमीच्या वापरातील काही औषधे (उदाः मलेरीयारोधक, अथवा सल्फा गटातील औषधे) रक्तनाशक आणि म्हणून कधीकधी  प्राणघातकही ठरतात. हे आधी माहीत असणं म्हणूनच आवश्यक आहे. हा आजारही जन्मतः ओळखता येतो पण तपासणी केली तर.


पण हे डॉक्टर सांगतच नाहीत. त्यांनाच माहित नसतं हा एक भाग आणि सांगितलं तर हा ‘अव्वाच्यासव्वा’ खर्च लोकांना अनाठायी वाटतो! मुदलात विषयच माहीत नसतो त्यामुळे, ‘हे काय नवीन खूळ’ असा खुळचट विचार मनात रुंजी घालू लागतो!! याच्या बिलात डॉक्टरांचा वाटा किती अशी शंका मनाला चाटून जाते!!! ‘हाय रे दैवा, ह्यापेक्षा दुसऱ्या दवाखान्यात सत्यात झालं असतं’, असा विषाद दाटून येतो!!!! हे सगळं ‘मन-निस्सारण’ निस्तरण्यापेक्षा डॉक्टर काही सांगतच नाहीत.
पण माझा सल्ला, त्यांनी सांगायची वाट पाहूच नका. तुम्हीच आग्रह धरा. एकवेळ कुंडली मांडू नका, बाळलेणी सावकाश एक एक करून घ्या पण जन्मतः हे तपासा, तपासा आणि तपासाच.

No comments:

Post a Comment