सत्य, सत्यपालसिंह आणि डार्विन.
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई (जि. सातारा) पिन ४१२
८०३
मो. क्र. ९८२२० १०३४९
“माकडा पासून माणूस निर्माण झालेला नाही कारण आमच्या पूर्वजांनी तसे काही
नोंदलेले नाही”, इतिः सत्यपालसिंह. खरेतर त्यांनी असे काही बोलल्यावर, प्रचलित
पद्धतीनुसार, ‘आमच्या ‘नाजूक वैज्ञानिक भावना’ दुखावल्याबद्दल त्यांचा शिरच्छेद करायला हवा’, अशीच मागणी मी करायला हवी.
अर्थात मी तसे म्हणणार नाही. त्यांना शिरच्छेदाची नाही तर माहितीची गरज आहे.
सर्वसामान्यपणे उत्क्रांतीबद्दल समाजात जे गैरसमज असतात तेच त्यांच्या बोलण्यातून दिसतात.
मुळात माणूस हा माकडापासून निर्माण झाला असे डार्विनने कुठेच म्हटलेले नाही.
त्यांनी असे दाखवून दिले की मानव आणि मर्कट हे एकाच पूर्वजांचे वंशज आहेत. म्हणजे
आपल्या चुलत भावापासून आपण जन्माला आलो असे आपल्याला म्हणता येईल का? नाही, पण
आपले आजोबा एकच होते, हे सत्य आहे. तसेच हे. हा धक्का पुढारलेल्या
पाश्चात्यांच्याही पचनी पडलेला नाही. डार्विनच्या हयातीतही यावर अत्यंत हीन वाद
झडले होते.
आजही तिकडे उत्क्रांतीवादाला
विरोध करणारे आणि बायबलमधील विश्वनिर्मिती हेच अंतिम सत्य मानणारे अनेक धर्मांध
लोक आहेत. तिथेही सत्यपालसिंह आहेत.
बरेच आहेत. तिथल्या राजकारणात, समाजकारणात याचं मोठं प्रस्थ आहे.
उत्क्रांतीवाद्यांचा दावा
असा की संपूर्ण जीवसृष्टी ही प्राथमिक अवस्थेतल्या सजीवांपासून सावकाशपणे
उत्क्रांत होत आली आहे. आजची सजीवांची
विविधता हा उत्क्रांतीचाच एक भाग आहे आणि माणूस हा देखील एक प्राणीच असून या
उत्क्रांतीचंच फलित आहे. तर विरोधी पक्षाचं म्हणणं असं की अगदी प्रथमावस्थेतील
प्राण्यात देखील अत्यंत गुंतागुंतीची जैवरासायनिक रचना असते. केवळ चार रसायने अपघाताने
एकत्र आली म्हणून ते रेणू ‘जीव’ धरू शकत नाहीत. तेव्हा सजीवांची उपज ही कोण्या
बुद्धिवान निर्मिकानं केलेली करामत आहे. ही मंडळी यासाठी मोठा मासलेवाईक दाखला
देतात. समजा चालता चालता तुम्हाला एक दगड दिसला तर तो तिथे निसर्गतः आहे हे मान्य
करता येईल, पण एखादं घड्याळ आढळलं तर ते काही निसर्गतः घडलेलं नाही हे उघड आहे.
घड्याळ्याच्या निर्मितीमागे कोणीतरी कसबी कारागीर आहे हे निश्चित. तद्वतच सजीवांची
गुंतागुंतीची रचना निव्वळ निसर्ग-अपघातांनी, आपोआप घडून येणे, अशक्य आहे. हा तर
कुणा कुशल निर्मिकाचा खेळ.
उत्क्रांतीवाद असे दाखवून
देतो की, अशा कोण्या घड्याळजीची गरजच नाही. स्वतःच्या नकला काढू शकणारे रेणू
(म्हणजे आपली गुणसूत्रे), ह्या नकला काढताना होणारे किंचित किंचित बदल आणि
नैसर्गिक निवडीची न-नैतिक, दिशारहित, शक्ती हीच जीवोत्पत्तीचे कारण आहे. ही शक्ती अशी
आंधळी आहे(Blind watchmaker). तिला काया, वाचा, मन, काही काही नाही.
आणखीही काही युक्तीवाद
आहेत. समजा एखाद्या जंबोजेटचे सारे भाग सुटे करून एखाद्या आवारात ठेवले आणि
चक्रीवादळासरशी ते एकत्र येऊन जम्बोजेट बनलं, असं कुणी सांगितलं, तर ते विश्वसनीय
वाटेल का? जम्बोजेट सारखी गुंतागुंतीची रचना केवळ वाऱ्यानं घडू शकेल का?
निर्मितीवाद्यांचं म्हणणं असं, की वादळानं जम्बोजेट बनणं जसं असंभवनीय आहे, तद्वतच
उत्क्रांतीनं सजीवांची निर्मितीही असंभवनीय आहे.
मात्र उत्क्रांतीवाद्यांच्या
मते हा सारा उत्क्रांतिवादाचा शुद्ध विपर्यास आहे. आलं वारं आणि झालं जम्बोजेट
तयार, असा मुळी युक्तीवादच नाहीये. पृथ्वीचं काही कोटी वर्षं असलेलं वय, त्या
काळातले भूकवचातले आणि वातावरणातले बदल, प्रयोगशाळेत निर्माण करता आलेली
अमिनोआम्ल, ठिकठिकाणी सापडलेले जीवाश्म आणि अव्याहतपणे तयार होणाऱ्या, आणि बदलाशी
जुळवून न घेता आल्यामुळे, नष्ट होणाऱ्या प्रजाती, हा सारा उत्क्रांतीच्या बाजुने भक्कम
पुरावा आहे.
अशा साऱ्या चर्चेत पाश्चात्य
धर्मवाद्यांनी केलेली अचाट आणि अफाट विधानं वाचून खूप बरं वाटतं. बरं अशासाठी की
झापडबंद विचार करण्याचा मक्ता काही निव्वळ भारतीयांकडे नाही, त्यात थोडे पाश्च्यात्यही
आहेत, ही ती सुखद जाणीव.
जीवोत्पत्तिच्या अनेक कल्पना अनेक शास्त्रज्ञ
मांडत होते. डार्विन कोणी साक्षात्कारी पुरुष होता किंवा त्याच्या पंजोबाना काही
‘दिसलं’ होते म्हणून त्याचा सिद्धांत मान्य झाला असे काही नाही. त्याच्या पुढे
मागे अनेक सिद्धांत आले आणि गेले. उदाहरणार्थ लामार्क यानेही उत्क्रांतीचा
सिद्धांत मांडला होता. पुढे तो मागे पडला. जगताना झालेले शारीरिक बदल पुढील पिढीत
संक्रमित होतात अशी त्याची मांडणी होती. ह्याचे गाजलेले उदाहरण म्हणजे जिराफाची
लांब मान. लामार्कची मांडणी अशी, की उंचावरचा पाला खाता खाता आखूड मानेच्या
जीराफांच्या माना लांबल्या, मग त्यांच्या मुला-बाळांच्याही लांबल्या आणि परिणामी काहे
पिढ्यात लांब मानेचे जिराफ तयार झाले. अर्थात एके काळी ह्या मांडणीला बरीच मान्यता
असली तरी नवीन संशोधनानंतर हा सिद्धांत मागे पडला. कोणाचा हात तुटला म्हणून त्याला
थोटी मुले होत नाहीत आणि जन्मतः सुंता केल्याने कुणाला सुंता झालेली मुले होत
नाहीत.
उत्क्रांतिवाद सांगतो, निसर्गतः काही जिराफ ऊंच
मानेचे निपजतात (Variation); त्यांना जगण्याच्या, तगण्याच्या आणि म्हणून
जुगण्याच्या, अधिक संधी प्राप्त होतात (Natural Selection); परिणामी पिढ्यांपिढ्या
माना ऊंच ऊंच होत जातात, अखेरीस ऊंच मानेचा जिराफ ही नवीनच प्रजाती उत्पन्न होते (Speciation).
थोडक्यात नव्या नव्या प्रकारचे जीव निर्माण होण्यात कर्ताकरविता हात हा नैसर्गिक
निवडीचा आहे, त्यासाठी कोणत्याही शक्तीची कल्पना अनावश्यक आहे.
उत्क्रांतीचा प्रवास हा चुकतमाकत, खाचखळग्यातून,
वेडावाकडा, कित्येक बंद गल्ल्यांशी घुटमळणारा प्रवास आहे. हा प्रवास ‘उन्नती’च्या
दिशेने नाही तर ‘परिस्थितीशी अनुकूल बदल’ होण्याचा दिशेने आहे. हे बदल यादृच्छेने
(Random), निसर्गतः होत असल्याने, त्यांना निश्चित दिशा नाही, अनिश्चित कालावधी
मात्र आहे. अक्षर ओळख नसताना निव्वळ काहीतरी आकार काढता काढता आपले नाव आपल्याकडून
बिनचूक लिहिले जाण्याची शक्यता खूप कमी आहे. तसे व्हायचेच झाले तर कितीतरी काळ
प्रयत्न करत रहावे लागेल. उत्क्रांतीला असाच प्रचंड काळ लागतो. हा कालपट समजावून
घेणे हा उत्क्रांतीचा अभ्यास करण्यातला महत्वाचा टप्पा आहे. पृथ्वीचे कोट्यवधी
वर्षांचे वय आणि जीवांच्या उत्पतीचा कालावधी पहाता, आपली आयुष्ये निमिषमात्रही
नाहीत. त्यामुळे आपल्याला दोन-तीन पिढया, किंवा काही हजार वर्षे, एवढी कल्पना सहज
जमते. पण उत्क्रांतीसाठी जी अति दीर्घकाळाची कल्पना करावी लागते तिथे आपले घोडे
अडते. उत्क्रांती आपल्याला अशक्य कोटीतली वाटायला लागते.
उत्क्रांती म्हणजे सतत उर्जीतावस्थेकडे प्रवास
असाही काहींचा गोड गैरसमज असतो. बऱ्याच फांद्यावाले डेरेदार झाड आणि त्याच्या
टोका-टोकाला एकेक सजीव असे चित्र जीवशास्त्राच्या पुस्तकात हमखास दिसते. या
झाडाच्या सर्वात ऊंच फांदीवर असतो माणूस. माणूस हा सगळ्यात अधिक उत्क्रांत प्राणी,
असे सुचवणारे हे चित्र साफ चुकीचे आहे. लक्षात घ्या, गांडूळ चिखलात राहू शकते,
तुम्ही आम्ही नाही. म्हणजेच चिखलात रहाण्यासाठी गांडूळ हा सर्वात उत्क्रांत जीव
आहे. आपण गांडूळाची जागा घेऊ शकत नाही आणि गांडूळ आपली जागा घेऊ शकत नाही. त्या
त्या ठिकाणी तो तो जीव सर्वात उत्क्रांत जीव आहे, म्हणुनच तर तो आहे. अन्यथा तो
केंव्हाच नष्ट झाला असता. थोडक्यात सर्वच जीव त्यांच्या त्यांच्या परिस्थितीत, परिसंस्थेत
सर्वात उत्क्रांत आहेत. माणूस म्हणून आपण फार माज टाकायची काही गरज नाही. आधुनिक
जीवशास्त्र कोणत्याही जीवाला कमी लेखत नाही. उलट सारी सृष्टी ही देवाने माणसाच्या
करमणुकीसाठी आणि खाण्यापिण्याची सोय म्हणून उत्पन्न केली; सबब माणूस सोडता अन्य
जीव नीच आणि माणूस, देवदूत, देव अशी पुढे चढती भाजणी अशी बऱ्याच धर्मांची मांडणी
आहे. ती किती कोती आहे हे उत्क्रांतिवाद दाखवून देतो. ‘मानवाचे अंती गोत्र एक’ ही
भावना उदात्त आहेच पण उत्क्रांतीची, ‘सजीवांचे अंती गोत्र एक’, ही भावना तर त्याहीपेक्षा
उदात्त आहे.
उत्क्रांतीच्या स्पर्धेत सबल तेवढे टिकतात असाही
एक लोकमान्य गैरसमज आहे. मुळात हत्यारे आणि संस्कृती काढून घेतली तर माणूस
दुर्बलाहूनही दुर्बल आहे. तेंव्हा बळ हे अनेक प्रकारचे असते हे लक्षात घेतले
पाहिजे. बाहू-बळ आहे तसेच बुद्धिबळही आहे. मानवापेक्षाही महाकाय असे प्राणी काळाच्या
ओघात नष्ट झाले आहेत आणि इवली लव्हाळी टिकली आहेत. लढायाही अनेक प्रकारच्या असतात.
दुष्काळात तगण्यासाठी शुष्कतेशी सामना जमायला हवा, थंडीत तगून रहाण्यासाठी
शीत-युद्ध जिंकता यायला हवे आणि तुमच्या सवयीच्या आहारातल्या ऐवजी एखाद्या
वेगळ्याच वनस्पतीने सर्व परिसर व्यापला, तर आता ती पचवण्याची तुमची ‘ताकद’ हवी.
अशा अनेक ताकदी, अनेक लढाया, अनेक कुरुक्षेत्रे, जीवांची क्षमता जोखत असतात.
प्रश्न निव्वळ शारीरिक ताकदीचा नाही. बदलता परिसर, बदलती परिसंस्था, बदलते वातावरण
या साऱ्याचा सजीवांच्या, जगण्या-तगण्या-जुगण्या-प्रसवण्यावर अनेकांगांनी दबाव येत
असतो (Selection Pressure). उत्क्रांती म्हणजे या नित्यनूतन, दबावात जे उरतात ते
पुढे पुढे जातात. जे मोडतात ते संपतात. उद्याच्या दाब-दबावाचा ना उत्क्रांतीला थांग असतो, ना सजीवांना पत्ता.
बंदुकीच्या शोधाचा अंदाज वाघांना होता काय?
जगण्याची जर ‘स्पर्धा’ असेल
तर प्रत्येक स्पर्धकाचं अ-हित हेच आपलं हित नाही का? आपल्याच भाईबंधांप्रती प्रेम,
जिव्हाळा, त्यांचं लालन, पालन, पोषण म्हणजे स्वतःला वैरी निर्माण करणे नाही का?
यावर बराच उहापोह झाला आहे. या अशा सहकार्यामुळे तो समूहच्या समूह/कुटुंब/प्रजाती
तगायला मदत होते. इतकंच काय कुणाला किती सहाय्य करायचं याचंही गणित मनातल्यामनात
मांडलेलं असत. आधी सगे, मग सोयरे, मग जातभाई, मग अन्य काही, अशा क्रमानी उपकार
केले जातात. पुढे कधीतरी परत फेडीच्या अपेक्षेनेही उपकार केले जातात. सबब
स्पर्धेसारखाच सहकार हाही उत्क्रांतीला उपकारच असतो.
डार्विनकडे जीवमात्रांच्या शरीर रचनेतील साम्य
एवढाच पुरावा होता. आता जीवाश्मातील, शरीरक्रीयातील, जैव-रासायनिक आणि जनुकीय
साम्य असा सज्जड पुरावा आहे. हा नाकारून नव्या सिद्धांतासाठी तीतकाच भरभक्कम
पुरावा समोर आला तर डार्विनचा सिद्धांतही नापास ठरेल. डार्विन नाकारणारी नवी समज,
ही तपासता येतील अशा तत्वांवर बेतलेली असावी. ‘आमचे पूर्वज काही वेडे होते का?’
वगैरे अभिनिवेशी भाषा त्यात नसावी, अशी किमान अपेक्षा आहे. ‘आमच्या आजा-पणज्यांनी
काही म्हटलेले नाही, सबब डार्विन अमान्य’, हे सत्यपालसिंहांचे विधान म्हणुनच मान्य
करणे शक्य नाही.
प्रथम प्रसिद्धी महाराष्ट्र टाईम्स, २८ जाणे २०१८