Friday, 10 June 2016

फादर टेरेसा

फादर टेरेसा
डॉ. शंतनू अभ्यंकर,वाई. सातारा. ४१२ ८०३.
या आणि अशाच shantanuabhyankar.blogspot.in हा माझा ब्लॉग जरूर वाचा.

त्या दवाखान्यात दोन प्रसिद्ध नर्सेस होत्या. एक होती मदर टेरेसा आणि एक होती फादर टेरेसा. नावाप्रमाणेच मदर टेरेसा सोज्वळ, प्रेमळ आणि लोकप्रिय होती आणि फादर टेरेसा होती खाष्ट आणि दुष्ट. मदर टेरेसा होती बुटकी, कृश आणि नाजूक तर फादर टेरेसा होती ऊंच, धिप्पाड आणि केसाळ. आवाज, वागणं, बोलणंही स्त्री सुलभ वगैरे नाही तर चक्क पुरुषी. नर्स कसली नरसोबाच तो… म्हणून ही फादर टेरेसा.

पैकी मदर टेरेसा ही मदर टेरेसा सारखीच असल्यामुळे तिच्या कहाणीत काहीच दम नाहीये. त्यामुळे तुम्हाला तीची कहाणी आवडणारही नाही आणि मी ती सांगणारही नाही.  सोज्वळ, सहृदय, पेशंट वर माया करणाऱ्या सिस्टरची कसली आलीय गोष्ट? या उलट फादर टेरेसा. हिचा लौकीक सर्वदूर पसरलेला होता. पेशंटला तर ही निव्वळ डोळे वटारूनच गप्प करायची. आम्हा ज्युनिअर रेसिडेंट डॉक्टरना निव्वळ अनुल्लेखानी किंवा एकदोन तिरक्या शेऱ्यांनी ठार मारायची ती. अन्य सिस्टरांच्यात जिभेचा दांडपट्टा चालवून ती स्थान राखून होती आणि सिनिअर डॉक्टर भीक नको पण कुत्रं आवर या न्यायानी तीच्यापासून चार हात लांब असायचे. येणे प्रमाणे व्यूहरचना असल्यामुळे ती ज्या गायनॅक थिएटरची इन्चार्ज होती तिथे तिची अनिर्बंध सत्ता नसती तरच नवल.

पण तिचे अवगुण होते तसे गुणही होतेच होते. ती ड्युटीवर असेल तर अमुक एक गोष्ट मिळाली नाही असं कधीच व्हायचं नाही. तिच्या राज्यात प्रत्येक वस्तूला एक जागा होती आणि प्रत्येक जागेवर एक वस्तू. नजरेच्या एका कटाक्षात तिला कुठे काय नाहीये हे बरोब्बर समजायचं. मग ती वस्तू जागेवर येईपर्यंत हिचं आकांड तांडव सुरु. सर्जरीला असिस्ट करायला ही असेल तर मजाच मजा. निव्वळ हात पुढे करताच अपेक्षित इंस्ट्रुमेंट हातात हजर. प्रत्येक सर्जरीची प्रत्येक स्टेप हिला पाठ. त्यातले पाठभेदही पाठ. अमका सर्जन ही स्टेप कशी  करतो, तमका कशी करतो हे ही पाठ. शिवाय ऐन वेळी येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी अनेक युक्त्या तिला माहित होत्या. ‘न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ असाच तिचा तोरा. एका बाजूला आम्हा ज्युनीअर डॉक्टरना आमची जागा दाखवून देत देत, सिनिअरना छान मदत करायची ती. हात जलद, हालचाली झपाझप आणि त्याच बरोबर हेड-एंड कडे, भुलीच्या डॉक्टरांकडेही, ही लक्ष ठेऊन असायची. सलाईन संपलं, पेशंटचे डोळे उघडे आहेत त्यात ऑईंटमेंट टाका, ओटूचं (ऑक्सिजन) प्रेशर ढपलंय, अॅनॅस्थेशियाचा टॉपअप् डोस लागणार, अशा सूचना सुरु असायच्या. शिवाय कुठल्या थिएटर मध्ये कुठली केस घेतली आहे, पुढे कोणची घेणार, त्याची तयारी, ह्या वरही लक्ष. काही कमी पडलं तर कुणाच्या लक्षातही येणार नाही अशा, सुगृहिणीच्या सफाइनी, ती वस्तू हजर करणार. सगळं झाल्यावर दाणेदार अक्षरात सविस्तर नोंदी करणार. आमच्या अर्वाच्य अक्षरापुढे फादरचं सुवाच्य अक्षर फारच उठून दिसे. कधी एकाही सॅम्पलवर नाव चुकणार नाही की एकही नोंद चुकणार नाही.

कामाला वाघ होती ती. एकदा तिनी आणि मी मिळून एका रात्रीत पाठोपाठ अकरा सीझर केली. एकाही सीझरला एकही गोष्ट कमी पडली नाही. तिनी ते सगळं झाल्यावर पुन्हा सगळी स्वच्छता करून, धुवून, ड्रम लावून  दुसऱ्या दिवशीच्या दहा ऑपरेशनसाठी ट्रॉली लावून ठेवल्या. हे सगळं ‘मुली’ हाताशी नसताना.

‘मुली’ म्हणजे नर्सिंग कॉलेजच्या स्टुडंट मुली. ‘मुली’ ह्याच नावानी ह्या ओळखल्या जात. ‘मुली’ ह्या मुळी सर्व नर्सिंगकामाच्या आधारस्तंभ. एकदा ह्या मुली आल्या, की सर्व सिस्टर मंडळी सुटकेचा निश्वास सोडून शांतपणे रजिस्टर भरणे, डबा खाणे, स्वेटर विणणे वगैरे करण्यात मश्गुल व्हायच्या. ह्या मुलींना सुट्टी असली की मात्र सर्व कामं उरकता उरकता सिस्टर लोकांची पार कंबर मोडून जायची. या मुलींच्या येण्याजाण्यावर फादरची सक्त नजर असायची. वेळेआधी जायचं तर नाहीच पण जाण्याची तयारीही करायची नाही असा कडक नियम होता. स्वतः फादरही हा नियम पाळायची. डब्याची पिशवी घेणं, केस नीटनेटके करणं, काही काही अलाउड नव्हतं. एकदा अशाच एका मुलीला फादरनी ड्युटी संपायची वाट पहाताना पकडलं. रन काढायला तयारीत असलेल्या बॅट्समनसारखी, ही वॉर्डाच्या क्रिझवर  काट्या वर काटा यायची वाट पहात होती. तिला पाहून फादर तणतणू लागली.
‘काय गं, कुठे एवढं जायचं असतं लगाबगा? बारा नंतर जर्रा थांबलीस तर तुझं काय रूप बीप बदलतं की काय; त्या सिंड्रेला सारखं? बारानंतर काय चेटकीत रुपांतर होतं काय तुझं?’
हे ऐकताच सगळा वॉर्ड फिदीफिदी हसू लागला. पुढे तर या मुलीचं नावच सिंड्रेला पडलं.
     
इतरांना अशी नावं ठेवण्यातच फादरची हयात गेली होती. ‘कुंती’ हे ही असंच एक नाव. कुंती हा खास कोड वर्ड, अविवाहित पण गरोदर मुलीसाठी. कुंती म्हणजे फादर टेरेसाला पर्वणीच. तिथे अशा अडल्या मुली भरपूर. कारण सर्वकाही फुकट. त्यामुळे फादर टेरेसाला अनेकदा सेवेची संधी देणाऱ्याही अनेकजणी! वेळेत आल्या तर गर्भपात, नाहीतर अशा मुलींसाठी तिथे वसतीगृह होतं. तिथे राहून पुढे प्रसूती झाली की ह्या मुली आपआपली बाळं रीतसर तिथल्या अनाथाश्रमाला देऊन मोकळ्या मनानं, मोकळ्या शरीरानं घरी जाऊ शकत. अशी कुंती आली की,  तिच्या ह्या पापाबद्दल ही बाई त्या मुलीला अशी काही बोलायची, अशी काही बोलायची की विचारायची सोय नाही. काही वाक्य मात्र गंमतीशीर असायची... ‘अशी कशी गं तू? असे कसे आधीच दिवस जातात? आं? नेमकं करता काय तुम्ही?...’ बहुतेक जणी टेरेसाच्या बोलण्यानीच गर्भगळीत होत. आमचं औषध निव्वळ निमित्तमात्र. असल्या मुलींबद्दल फादर टेरेसाच्या मनात काडी इतकीही सहानुभूती नसायची. त्यांना हिडीस फिडीस करत, हाकलत हाकलत, शाब्दिक आणि शारीरिक फटकारे देत,   हीचं सगळ काम चालायचं. त्या मुलींना त्यांच्या पापाची शिक्षा देण्याची संपूर्ण जबाबदारी ही आपल्या शिरावर घ्यायची. आधीच अडचणीत असलेल्या ह्या अभागिनी हिच्या या दुखाःवरच्या डागण्या सहन न होऊन हमसाहमशी रडायच्या. मग तर हिला आणखीनच चेव यायचा. आपल्या औषधाची मात्रा बरोब्बर लागू पडली आहे असं तिला वाटायचं. अनीती, पाप, संस्कार, कलीयुग वगैरे शब्दांची हत्यार परजत ती पुन्हा पुन्हा हल्ला करायची. आधीच नामोहरम झालेल्या शत्रूला आणखी नामोहरम करायची. तिला यात प्रचंड सात्विक समाधान लाभायचं. अनीती, पाप, संस्कार, कलीयुग वगैरेचा प्रभाव, ‘परिस्थिती’ नामे आणखी एक घटक नियंत्रित करत असतो हे तिच्या गावीही नसायचं.  

स्वतःची वचकदार, कडक, हुकुमशाही प्रतिमा तिला अति प्रिय होती. परिस्थितीनुसार ही प्रतिमाही बदलायची; पण अगदी तात्पुरती. एकदा कोणी परदेशी पाहुणे व्हिजिटला आले. त्यांच्या पुढेपुढे करण्यात तिचा अख्खा दिवस गेला. एकदम, अचानक सुहासिनी, सुमधुरभाषीणीच झाली तिची. तिची ही रंगावृत्ती बघून आम्हाला खूप गंमत वाटली. त्या परदेशी बाई जाता जाता म्हणतात कशा,
‘सिस्टर यु आर सो मेलो, सो सॉफ्ट, इट इस डिफिक्ल्ट टू बिलीव्ह दॅट यू आर द नर्स इंचार्ज!’ (‘तुम्ही इतक्या गोड आहात की तुम्ही मुख्य सिस्टर आहात हे पटतच नाही!’)
हे आपलं कौतुक आहे हेच तिला कळलं नाही. सिस्टर म्हणजे कशी टेरर हवी हेच तिच्या डोक्यात.
‘नो,नो,नो...’ ती चवताळली, ‘आय अॅम व्हेरी स्ट्रिक्ट. नो नोंसेंस आय टॉलरेट. आय व्हेरी व्हेरी...’ पुढे तिला शब्द सापडेनात.

एकूणच भाषा या प्रकारानी फादरला बराच त्रास दिला होता. हिला शब्द कोड्याचा नाद होता आणि समर्थांच्या दासबोधाचा. दासबोधावरच्या काही परीक्षा द्यायची ती. पण दासबोध वाचूनही हिची शब्दसंपदा अगदी मर्यादितच होती. साधे सोपे शब्द हिला यायचे नाहीत. संध्याकाळी ‘संध्यानंद’ मधलं महा शब्दकोडं घेऊन फादर टेरेसा टेबलाशी ठाण मांडून बसलेली असे. मी आलो की तिची पृच्छा सुरु. “सssर, ‘क’ पासून सुरु होणारा आणि ‘ता’ नी संपणारा काव्य ह्या अर्थी शब्द कोणता?”

मधूनच तिला इंग्लिश शब्दकोडं सोडवायची सुरसुरी यायची. एकदा तर धमाल आणि कमाल दोन्ही झाली. ‘स्त्रीशी संबंधित आणि  ‘UNT’ नी शेवट होणारा, चार अक्षरी शब्द कोणता?’ हा तिचा सवाल होता. (अपेक्षित उत्तर होत ‘A’. AUNT) अश्लील आणि फाजील डोक्याच्या सर्व रेसिडेंट डॉक्टरांच्या मनात पहिलं उत्तर आलं ‘C’ (CUNT, स्त्री बाह्यांगासाठीचा हा अश्लील शब्द). पण आपण ‘C’ सुचवला तर पुढे ही त्याचा अर्थ विचारणार आणि मग काय सांगणार? या पेचात पडल्यामुळे जो तो तिला, ‘नाही येत’ असं सांगून कटवत होता. कटवत होता आणि गालातल्या गालात, पण खदाखदा हसत होता! फादरही आता इरेला पेटली. सगळ्या वॉर्डातून फिरून तिनी झाडून साऱ्या रेसिडेंटना करमणूक पुरवली.  इतक्यात तिकडून मदर टेरेसा आली आणि तिनी झटकन ‘A’ हा पर्याय सुचवून सगळी गंमत घालवली!

उत्साहाच्या भरात फादर टेरेसा असा दैदिप्यमान परफॉरर्मंस द्यायची की ज्याचं नाव ते. एकदा एका उत्तरप्रदेशी भैयीणीवरही तिनी असाच आपल्या हिंदी भाषेचा प्रयोग केला. ‘संडासला खडा होतो का?’ असं विचारण्यासाठी तिनी खणखणीत आवाजात, ‘संडास को खडा होता है क्या?’ असा खडा सवाल केला. ह्यावर त्या भैयीणीची चर्या ढळली. थोडं इकडे तिकडे बघत, खालच्या आवाजात ती म्हणते कशी, ‘नाsssही मैंडम, संडास तो हम बैठकेही करत हैं! संडास करते समय खडा होना तो ठीक नाsssही लागत!’ वर कसानुसा चेहरा करून तिनी फादरलाच खालच्या आवाजात सवाल केला, ‘आपकी क्या राय होगी?’

एके रात्री गंमतच झाली. जुलाब होतायत म्हणून राणी नलावडे नावाची पेशंट अॅडमिट झाली. झाली म्हणजे केली गेली. रात्रीचा अंमल सगळ्यांच्यावर चढला असल्यामुळे अंमळ घोळच झाला. रात्रभर सलाइनचा अभिषेक झाल्यामुळे सकाळी ताजीतवानी झालेली ‘राणी’ लेडीज वॉर्डच्या बाथरूम मध्ये चक्क घोटून घोटून दाढी करताना सापडली! तपासाअंती राणी नलावडे हा हिजडा लेडीज वॉर्डात अॅडमिट झाल्याचं निष्पन्न झालं. अॅडमिशनच्या वेळी फादर टेरेसा ड्युटीवर होती. पेशंट जेन्ट्स वॉर्डात पाठवा अशा नोंदी असूनही हिनीच उत्साहाच्या भरात तिला लेडीज वॉर्डात पाठवलं होतं. उलट डॉक्टरांचा ‘चर्खमू’पणा आता उघड करायला मिळेल म्हणून ही मनात मांडे खात होती. पण घात झाला.

एखाद्या बडया हॉस्पिटलमध्ये एका वॉर्डातून पेशंट दुसऱ्या वॉर्डात जाणे ही एक मोठी प्रोसीजर असते. डॉक्टरच्या ऑर्डर, सिस्टरच्या ऑर्डर, दिले-घेतलेल्याचे हिशोब असं बरंच काही काही करावं लागतं. त्यातून डिलिव्हरीच्या पेशंटला ताप आला म्हणून तापाच्या वॉर्डात, किंवा तापाच्या बाईला डिलिव्हरीच्या कळा सुरु झाल्या म्हणून उलट, हे सहजशक्य आहे. पण लेडीज वॉर्डात रात्री बाई म्हणून अॅडमिट केलेलं माणूस सकाळी बाप्या म्हणून शिफ्ट करायचं हे म्हणजे आक्रीतच. प्रकरणाला हळूहळू भलताच रंग चढायला लागला. जेन्ट्स वॉर्डची सिस्टर म्हणाली, ‘डॉक्टरांची नोंद असल्याशिवाय मी नाही पेशंट इथे घेणार’. डॉक्टर म्हणाले, ‘आम्ही तर आधीच जेन्ट्स वॉर्डला पाठवा असं लिहिलेलं आहे. आणखी वेगळी काय नोंद करणार? फादर टेरेसानीच काय ते लीहून द्यावं.’ फादर टेरेसाला काही म्हणायला वावच नव्हता.

इकडे लेडीज वॉर्डात राणीचे संडासात हेलपाटे सुरु होते. पण आता त्या संडासात जायला तिथल्या सर्व पेशंटनी नकार दिला! हे प्रकरण आता ह्याही दिशेनी तुंबू लागलं.

फादर टेरेसाला कोणी म्हणजे कोणीच मदत केली नाही. उलट अगदी गरीब बिचारी होई पर्यंत सगळ्यानी तिला ह्या प्रकरणी छळलं. हेड ऑफ द युनिट, हेड ऑफ द डिपार्टमेंट, हॉस्पिटल सुपरीटेंडेंट असं करत करत हे प्रकरण डीनपर्यंत गेलं. शेवटी आपल्या अधिकारात डीननी ‘राणी नलावडे’च्या लिंगात कागदोपत्री बदल केला आणि अखेर ती/तो जेन्ट्स वॉर्डात डेरेदाखल झाली/ला. जुलाबानी कोमेजलेला पण गुलाबी लुगड्यात गुंडाळलेला हा नरदेह पाहून आता जेन्टस् वॉर्डात धमाल उडाली. बेशुद्ध जेन्ट्स शुद्धीवर आले आणि शुद्धीतले बेशुद्ध पडले. राणीनंही मोठ्या टेचात, इथल्या पेक्षा तिथेच मला बरंSSS वाटत असल्याच जाहीर केलं.  शेवटी कालचा गोंधळ बरा होता हे लक्षात घेऊन, राणीचे जुलाब थांबले आहेत, आता बरं वाटत आहे, असं जाहीर करून तातडीनी डिस्चार्ज देण्यात आला.
           
    तिचा आगाऊपणा बरेचदा असा तिच्याच अंगाशी यायचा पण फादरनी कधी त्यापासून धडा घेतला नाही. घटनाही कशा सतारीच्या तारा जुळाव्यात तशा जुळून यायच्या. एकदा काय झालं, ऐन उन्ह्याळ्याचे दिवस होते. बाहेर ऊन मी म्हणत होतं. मात्र त्या अवाढव्य हॉस्पिटलमधली एक खोली मात्र गारेगार होती. तिथे नव्यानीच प्राणप्रतिष्ठा झालेलं सोनोग्राफीचं मशीन विराजमान होतं. नुकतेच हे अत्याधुनिक तंत्र शिकून आलेले एक ज्येष्ठ डॉक्टर तयारी करत होते.  पेशंटची ‘आतून’ म्हणजे योनीमार्गे तपासणी करायची होती. त्यानुसार निव्वळ चादर पांघरून तिला झोपवलं होतं. नव्या तंत्राबद्दल काहीही माहीत नसतानाही फादर टेरेसाची अखंड टकळी चालू होती.

आतून सोनोग्राफी करताना त्या सोनोग्राफीच्या प्रोबवर प्लास्टिकचं आवरण चढवणं आवश्यक असतं. असं स्वस्त, मस्त आणि एकदा वापरून फेकून देण्याजोगं आवरण, म्हणजे कंडोम. यामुळे प्रोब स्वच्छ रहातो, पुन्हा पुन्हा वापरता येतो. आता पितामह डॉक्टरनी खिशातून कंडोम काढला. उघडला. त्याचं ते आता नेमकं काय करणार याची काहीच कल्पना नसल्यामुळे फादर टेरेसा सर्द झाली. अंधार, ए.सी., कोपऱ्यातली शांत खोली, ‘तैयार’ असलेली पेशंट आणि शांतपणे खिशातून बाहेर येणारा कंडोम याची तिनी काय संगती जुळवायची ती जुळवली आणि पटकन बोलून गेली; ‘ह्याची काही गरज नाही डॉक्टर, तिनी कॉपर टी बसवलेली आहे!’ हे फादर-वचन ऐकताच पितामह जागच्याजागी थिजून गेले. हसावं का रडावं तेच कळेना त्यांना. या गुस्ताखी बद्दल फादरला नुसत्या नजरेनीच त्यांनी क्रुसावर चढवलं आणि संयमाची पराकाष्ठा करत शांतपणे तपासणी उरकली.
     
काही आजारांमध्ये पेशंटची तपासणी ही पेशंट खोकत असताना करायची असते. पोटातला दाब अचानक वाढला की काय होतं हे पहाणं हा हेतू. शौच्याच्या जागेत किंवा योनीमार्गात इंस्ट्रुमेंट टाकून, लाईट टाकून ही तपासणी चालते. एकदा अशीच एक तपासणी चालू होती. इंस्ट्रुमेंट इष्ट ठिकाणी घालून, लाईट लावून, खाली डॉक्टर सज्ज होते. वर फादर टेरेसाच्या सूचना चालू होत्या. त्या बाईंना,  ‘खोका’, असं सांगून झालं. पण बाई ढिम्म. विनवून झालं, पण बाई ढिम्म. खडसावून झालं, पण बाई ढिम्म. बोंबलून झालं; हेच सगळं हिंदीतून करून झालं, पण बाई ढिम्म त्या ढिम्मच. फादरनी शेवटी स्वतः खोकुन दाखवलं पण बाई ढिम्म. अनिमीष नजरेनी त्या बाई आपल्या फादरकडे बघताहेत. शेवटी फादरनी नीट समजावून सांगितलं... ‘अहो बाई, वरून जसं खोकता ना तसं खालून खोकायचं!’ पण बाई ढिम्म.

इतकं सगळं सांगूनही ही बाई काहीच ऐकत नाही हे सांगायला फादर तिच्या नातेवाईकांकडे तक्रार करायला गेली. तेंव्हा तिला त्यांनी शांतपणे सांगितलं,
‘ती ठार बहिरी  आहे!! काय सांगायचं ते खाणाखुणांनी सांगा.’
‘आता खालून खोका!’ ही सूचना फादर खाणाखुणानी कशी देणार ह्या कल्पनेनी आम्ही लोटपोट हसू लागलो.

अन्य जगप्रसिद्ध व्यक्तींच्या असतात तशा फादर टेरेसाच्या काही दंतकथाही प्रसृत होत्या. एकदा म्हणे तिनी तिच्या लहान मुलाला हॉस्पिटल दाखवायला म्हणून मोठया कौतुकानी आणलं. लॅबॉरेटरीत गेल्यावर तहान लागली म्हणून ह्या अवली चिरंजीवांनी तिथे असलेलं छोट्या डब्यांमधलं ‘पाणी’ पिलं. तेवढ्यात फादर टेरेसाचं तिकडे लक्ष गेलं. हे पोरगं चक्क पेशंटची ओळीनं मांडलेली युरीन सॅम्पल प्राशन करते झाले होते! एकच हलकल्लोळ उडाला फादर टेरेसा तर डोक्याला हात लावून मटकन खालीच बसली. आपल्या पोराला काही होईल ही काळजी त्यामागे नव्हती तर आता पेशंटला रिपोर्ट कसे द्यायचे ह्याचं तिला टेन्शन आलं होतं.

काही कॅन्सर मध्ये बेंबीशी गाठ येते. ह्याला सिस्टर मेरी नोड्यूल असं म्हणतात. डॉ. मेयो यांची असिस्टंट आणि इतरही बरंच काही असलेली ही सिस्टर मेरी. हिनी ह्या गाठीचा संबंध सर्वप्रथम लक्षात आणून दिला. त्यावर तिनी एक पेपरही लिहिला. त्या बरोबर तीचं नावही वैद्यकीच्या इतिहासात अजरामर झालं. असं काही तरी भव्य दिव्य करायची फादरला आस होती. पण कामाच्या रामरगाड्यात तिला ही आस कधी पुरी करता आली नाही. तिच्या परीनी ती नव्या नव्या योजना मांडायची पण डॉक्टर लोक बरेचदा ऐकलं न ऐकल्यासारखं करून तिला मार्गी लावायचे. तिची एक कल्पना मात्र प्रत्यक्षात आली. तिनी माता मार्गदर्शन वर्ग सुरु केले. नेटानी सुरु ठेवले.

डिस्चार्जच्या दिवशी ती सगळ्या बायकांना एकत्र बोलावून ब्रेस्ट फीडिंग बद्दल लांबलचक भाषण ठोकत असे. मुद्दे चांगलेच असत. ती करत होती ते चांगलंच होतं पण हे भाषणही समजावणीच्या सुरात नसायचं. हुकुम सोडल्या प्रमाणे ती भाषण करायची. मग प्रश्नोत्तरे व्हायची.

एकदा फादरच्या सुनेचीच डिलिव्हरी झाली. मग भाषण ठोकायला हिनी आमच्या हेड ऑफ द डिपार्टमेंटनाच बोलावलं. तेही आले.
शेवटी सुनेनीच प्रश्न विचारला,
‘बाळाला अंगावर पाजताना खाण्यापिण्याचं काय काय पथ्य पाळावं? ’
‘काहीही पाळू नये.’ सरांचं थोडक्यात, नेमकं आणि पॉइंटशीर उत्तर! वर सरांनीच आता उलट प्रश्न केला,
‘जर काही कारणानी म्हशीचं दुध द्यावं लागलं तर म्ह्शीला काय स्पेशल पथ्यावर ठेवणार का तू?’
सून शांतपणे म्हणाली,
‘...पण सर, म्हशींना सासूबाई नसतात!!’

फादर टेरेसालाही कौटुंबिक दुखः होतीच. कधी कधी अगदी मनातलं भळाभळा बोलायची. एके दिवशी तीचं दुखः ती असंच मोकळं करत होती... कढ गळ्याशी दाटून येत होते... आवंढा गिळत ती म्हणते कशी, ‘आमच्या ह्यांचा एकच प्रॉब्लेम आहे,  माझ्याकडे मुळीच लक्ष देत नाहीत. तसं बघायला गेलं तर चांगले गुरांचे डॉक्टर आहेत!!!’

फादर टेरेसाची हयात इथेच गेली होती. आमच्या कित्येक शिक्षकांना तिनी ‘स्टुडंट-डेज  पासून टीचर-डेज’ पर्यंत बघितलं होतं. आता प्रोफेश्वरकी प्राप्त, अशा कित्येकांबरोबर,  हिनी नर्सिंगची विद्यार्थिनी असताना काम केलेलं. छेडछाड केलेली. त्यामुळे ही आपली सगळ्यांशी एकेरीतच बोलायची. आम्हा विद्यार्थ्यांना याचा भयंकर राग यायचा.  पण प्रोफेश्वर मंडळीही हे चालवून घ्यायची. जुने संबंध हे एक कारण आणि फादर टेरेसाला, कौन कितने पानी में हे ही बरोब्बर ठाऊक होतं हे आणखी एक कारण. कुणी वेळोवेळी ऑपरेशन मध्ये काय काय गोच्या केल्या, कुणाचं काय काय चुकलं, कोण कुणाशी भांडत होतं किंवा तंडत होतं, लफडी, कुलंगडी... ह्या सगळ्याचा सातबारा होता तिच्याकडे. त्यामुळे फादर टेरेसाला सगळे टरकून असायचे.

साक्षात आमच्या गुरुंना अरे तुरे आणि अगं तुगं करणारी, आमची पदोपदी मानहानी करणारी ही फादर टेरेसा रेसीडेंट लोकात भलतीच अप्रिय होती. ती रिटायर झाली त्या दिवशीच्या निरोप समारंभाला कोणी म्हणजे कोणीच गेलं नाही. चहा सामोसे असूनही नाही. चहा गार झाला. सामोसे कोमेजले. फादर टेरेसा काय समजायचं ते समजली.

फादर गेली आणि डिपार्टमेंटमधली जान गेली. निरोप समारंभावर बहिष्कार टाकून तिला शेवटी टांग घातल्याचं आम्हाला समाधान होतं आणि शेवटपर्यंत मोडेन पण वाकणार नाही या बाण्यानं काम केल्याचं तिला समाधान होतं. थोडक्यात काय विभक्त झाल्यावर दोन्ही पक्ष आपापल्या ठिकाणी सुखासमाधानानी नांदू लागले.


या आणि अशाच shantanuabhyankar.blogspot.in हा माझा ब्लॉग जरूर वाचा.