सय्यद गलाह
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
कोण कुठला सय्यद गलाह,
अचानक माझ्याच वर्गात माझ्याच बॅचला दाखल होतो काय आणि चांगला मित्र बनतो
काय, सारंच जरा वेगळं घडलं.
...आणि आता रोज बातम्या येतात युद्धाच्या,
निर्वासितांच्या, छळ छावण्यांच्या, क्रांतीच्या आणि प्रतिक्रांतीच्या. रोज
टी.व्ही.वर चित्र झळकतात, वर्तमानपत्रात मोठे मोठे फोटो येतात; युद्धात मेलेल्यांचे,
मारणाऱ्यांचे, मरायला टेकलेल्यांचे, मरायला तयार असणाऱ्यांचे आणि मारण्यासाठी
लायनीत उभे केलेले जीव सगळे. असं रोजच छापून येतं म्हटल्यावर रोजच मला सय्यदची
आठवण येते. तो वगळता त्याच्या कुटुंबियांना मी भेटलेलो नाही. पण तरीही युध्दपीडीत
माणूस, कुटुंब, देश वगैरे म्हटलं की मला आपोआप सय्यद, त्याचं कुटुंब आणि देश
आठवतो.
तो अफगाणिस्तानचा. मेडिकल
कॉलेजला पहिल्या वर्षाला माझ्या वर्गात आला. त्याला हिंदी, इंग्रजीचा गंध नव्हता.
त्याची अॅडमिशनच मुळी एक आंतरराष्ट्रीय मामला होता. त्याचे वडील दिल्लीत, अफगाण
वकीलातीत, कोणी बडे अधिकारी होते. अफगाण कम्युनिस्ट पक्षाचे ते एक मोठे नेते होते
म्हणे. सय्यदही शाळेत असतानाच रशियात गेला होता, शाळेसाठी, लष्करी प्रशिक्षणासाठी
आणि कम्युनिस्ट होण्यासाठी! बंदुका, बॉम्ब वगैरे हाताळण्याचं तंत्र अवगत होतं
त्याला; कम्युनिसम् नव्हतं. भाषा अवगत होत्या रशियन आणि पुश्तू. वडलांची दिल्लीत
बदली झाल्यावर तो दिल्लीत आला. भारत आणि अफगानिस्तान हे दोन्ही देश रशियाचे
बगलबच्चे म्हणून ज्ञात होते. होतेच ते बगलबच्चे. अफगाणिस्तानात नुकतंच सैन्य घुसवलं
होतं रशियानं. तिथल्या जनतेच्या मनाविरुद्ध. ‘क्रांतीच झाली अफगानिस्तानात त्याला
आमचा काय इलाज?’, असा रशियाचा सवाल; आणि ‘असल्या छप्पन क्रांत्या बघितल्याहेत,
असल्या क्रांत्यांचं नेमकं काय करायचं हे आम्हाला चांगलं माहीत आहे’, हा अमेरिकेचा
आग्रह. पण रशियाच्या ह्या आंतरराष्ट्रीय दादागिरी पुढे ब्र काढायची भारताची हिम्मत
नव्हती. उलट अफगाण सरकारला मान्यता, तिथल्या सर्व संस्थात्मक ढाच्याला आधार आणि
ह्यातून परस्पर पाकिस्तानला शह असंच धोरण होतं. मग यातूनच भारतातल्या अफगाणी
अधिकाऱ्यांच्या सर्व गरजांची काळजी घेणं ओघानच आलं. मग त्यात त्यांच्या मुलांचीही
काळजी आली. मग त्यात त्या मुलांच्या शिक्षणाचीही काळजी आली. आणि येणेप्रमाणे सय्यद
माझ्या वर्गात दाखल झाला. पुण्याला कॉलेजला जायचं म्हणल्यावर त्यानी दिल्लीत
इंग्रजीचा क्लास लावला होता, दोन महिन्यासाठी!
पहिल्याच दिवशी कॉलेज
संपल्यावर मला म्हणाला रूमवर सोड.
‘कुठे आहे रूम?’
त्यानी चक्क स्टेशनजवळच्या
प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलचंच नाव घेतलं. मी उडालोच. जिथल्या लाल रुजाम्यावर
चालण्याकरता आमचे पाय आसुसले होते, जिथल्या दारवानाच्या कुर्रेबाज मिशांच्या मिजाशीपुढे आम्ही चाचरायला
लागायचो अशा त्या हॉटेलात हा गेले पंधरा दिवस रहात होता. कॉलेज सुरु होईपर्यंत म्हणून ही व्यवस्था होती.
तो लवकरच होस्टेलवर दाखल होणार होता, झालाच दाखल चार दिवसात.
कुठे ते हॉटेल आणि कुठे
आमचं होस्टेल. पण सय्यदनी थोडीसुद्धा नाराजी दाखवली नाही. अगदी सहजपणे तो
होस्टेलच्या कुशीत शिरला. गैरसोयी आणि ढेकणांना पुरून उरला. त्याची ही सहनशक्ती
अजबच म्हणायची.
त्याची रूम होती ई ब्लॉकवर,
टॉप फ्लॉअरला, पण तो पडीक असायचा माझ्याच रूम वर. सक्काळी जॉगिंग, मग डी ब्लॉक
समोर चहा, मग लेक्चर, क्लिनिक, डबा, लेक्चर, संध्याकाळी व्हॉलीबॉल, फुटबॉल, रात्री
डबा, जर्नल कमप्लीशन, जनरल टवाळक्या....आणि मग रनिंग रेस! रोज रात्री होस्टेल
समोरच्या रिकाम्या गल्लीत रनिंग रेस व्हायची. रोज सय्यद जिंकायचा, रोज रात्री रबडी
पाजायचा आणि झोपायला तेवढा रूमवर जायचा. त्या रबडीइतकंच गाढ मैत्रं जुळलं हळू हळू.
एकदा सहज त्याचं बँकेचं
पासबुक दाखवलं त्यांनी तर त्यातली रक्कम बघून माझे डोळेच फिरले. ‘एवढी मोठी रक्कम तू सेव्हिंग खात्यात कशाला ठेवलीस?’; असं
विचारताच वडलांनी पुढील पाच वर्षाची तरतूद म्हणून हे पैसे पाठवल्याचं त्यानी
सांगितलं. मग आम्हीच दोघांनी बँकेच्या मॅनेजरना भेटून एफ.डी. वगैरे केल्या. एवढ्या
मोठ्या रकमेची एफ.डी. बसल्या जागी मिळत्येय हे पाहून त्या मॅनेजरना कृतकृत्य होत
होतं. पण आमचं वय, आमची ष्टोरी आणि रक्कम यांचा मेळ बसेना. काबुल, दिल्ली, कॉलेज,
पुणे, सय्यद, नोज नॉट इंग्लिश...असं ते बराच वेळ पुटपुटत राहिले. त्यांना भलत्या
भलत्या शंका यायला लागल्या. तेवढ्यात सय्यदनी त्याचा तो डिप्लोमॅटीक पासपोर्ट-सम
पासपोर्ट पुढे केला. आधी त्या मॅनेजरना त्यात काही गम्य दिसलं नाही पण आतल्या
केबिन मधून त्यांनी कुणालातरी फोन लावला आणि त्यांना त्या पासपोर्टचं महत्व उमगलं.
तात्काळ किती आणि कशी मदत करू असं झालं
त्यांना. त्यांनी चहा बिस्किटे मागवली आणि पुढे एफ.डी.च्या पावत्या द्यायला जातीनं
रूम वर आले साहेब. रूमची आणि त्यातील सय्यदची अवस्था पाहून त्यांना आमच्याबद्दल पुन्हा
शंका आली असणार!
कॉलेज सुरु झालं तेव्हा
रशियाने आपल्या फौजा अफगानिस्तानातून काढून घ्यायला नुकतीच सुरवात केली होती. हा
टेकू जाताच तिथलं, नजीबचं सरकार अस्थिर झालं होतं. प्रचंड यादवी माजली होती.
कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता. चीनी आणि अमेरिकन समर्थन असलेल्या मसूदच्या
फौजा, पाकिस्तानचा कळसूत्री बाहुला हेकमत्यार आणि अरबी आधारानी लढणारा हक्कानी हे
सगळे नजीब सरकार विरुद्ध लढत होते. मधूनच वेळ मिळाला की अपापसातही लढत होते. हे
सगळं समजायचं काही त्रोटक बातम्यांवरून. ‘टाईम्स’ किंवा ‘एक्स्प्रेस’ मध्ये काय कॉलमभर
बातमी येईल त्यावरून. सय्यद आसुसलेला असायचा, मायदेशीच्या बातम्यांसाठी. पण मार्ग
कोणताच नव्हता. त्याला मग एके दिवशी ब्रिटीश कौन्सिलच्या लायब्ररीत घेऊन गेलो.
काही दिवस हा क्रम चालला. तिथल्या आंतरराष्ट्रीय पेपरात इथल्यापेक्षा जरा जास्त माहिती यायची. पण
ते पेपर ब्रिटीशधार्जिणे होते आणि त्यातल्या बातम्या या बंडखोरांच्या बाजूनी
असायच्या. राष्ट्राध्यक्ष नजीब यांचा उल्लेखच मुळी ‘नामधारी अध्यक्ष’ असा असायचा. पुढे पुढे नजीब
सरकारचा पाडाव स्पष्ट दिसायला लागला. ‘क्रूर’, ‘नादान’, ‘रशियाच्या ओंजळीनी पाणी
पिणाऱ्या’ सरकारचा धिक्कार, पानोपानी दिसायला लागला. बातम्याही त्रासदायक आणि
त्यातली भाषाही क्लेशदायी. ब्रिटीश कौन्सिलच्या भेटी बंदच झाल्या हळूहळू. आता
टी.व्ही.वरचा प्रणव रॉयचा ‘द वर्ल्ड धिस वीक’ हा कार्यक्रमच उरला फक्त.
अफगाणिस्तानात काही भलं घडतच नव्हतं. दर आठवड्याला बुरं तेवढं ऐकून खालमानेने सय्यद रूमवर परतायचा. पण नजीब तसा
चिवट. जाता जाता रशियानी त्याला शस्त्रास्त्रांचा भरपूर प्रसाद दिलेला. ह्या
जोरावर सरकार तगून होतं.
इकडे फर्स्ट इअरची परीक्षा
आणि तिकडे जलालाबादेत धुमश्चक्री पेटलेली. बंडखोरांनी सर्वशक्तीनिशी हल्ला केलेला.
सय्यद विदीर्ण.
‘मी नापास झालो तर रे, तरी
देखील मैत्री राहील नं आपली?’ परीक्षेआधी त्याचा मला प्रश्न. त्याच्या चेहऱ्यावर
प्रचंड काळजीची काजळी.
‘अर्थात’ माझं बेसावध
उत्तर.
‘अरेच्या! मला वाटलं तू
म्हणशील, ‘सय्यद, तू नापास कसा होशील? तू पासच होशील!!’’ सय्यद.
तो नापास होणार नाही असा
आश्वासक सूर ह्वा होता त्याला. पण तो पास होणं शक्यच नव्हतं. एक वर्ष तर इंग्लिश
शिकण्यातच गेलं होतं. नुकतंच तर त्याला कुठे बऱ्यापैकी इंग्लिश जमायला लागलं होतं.
आता येत्या सहा महिन्यात परीक्षा. दीड वर्षाचा सगळा अभ्यासक्रम नेमलेला. तेवढ्यात
जुजबी इंग्लिशच्या जोरावर, दीड वर्षाचा
अभ्यासक्रम वाचणं, आत्मसात करणं, आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं जाणं हे
अशक्यच होतं. पण सय्यदला मात्र माझ्याकडून आश्वासक प्रतिसाद हवा होता. तो त्याचा
हक्क आणि माझी जबाबदारी होती. मी कुठून देणार होतो त्याला विश्वास? इथे भल्या
भल्यांची फाटली होती; पण माझ्या उत्तरानी तो खूप दुखावला गेला. जलालाबादची लढाई नजीबनी
जिंकली, त्या उन्मादात सय्यदनी परीक्षाही मोठया आत्मविश्वासानी दिली, पण सय्यद
फर्स्ट इयरला लटकला.
पहिल्या वर्षी नापास
मुलांना सहा महिन्यांनी पुन्हा परीक्षा देता येते. ती पास झाल्यावरच त्यांचं दुसरं
वर्ष सुरु होतं. या बॅचला ऑड बॅच म्हणतात. एकदा तुम्ही ऑड बॅचला गेलात की तुमच्या बरोबरच्या मित्रांची सांगत
आपोआप सुटते. कारण वर्ग, प्रॅक्टिकल, क्लिनिक, परीक्षा ह्या सगळ्याचं वेळापत्रक
कधीच जुळत नाही. भेटी-गाठी, एकत्र खेळ, अभ्यास, दंगा हेही मग कमी कमी होत जातं.
शिवाय रेग्युलर बॅचचा अहंगंड आणि ऑड बॅचचा न्यूनगंड कमी अधिक प्रमाणात उरली सुरली
मैत्री संपुष्टात आणतो. सय्यद अपेक्षेप्रमाणे ऑड बॅचला गेला पण तरीही आमची मैत्री
मात्र विरली नाही.
फर्स्ट इयरचा रिझल्ट लागला
तो दिवस जगाच्या इतिहासात ऐतिहासिक ठरला. त्या दिवशी जर्मनीची ती कुप्रसिद्ध भिंत छीन्न
छीन्न झाली. त्याची मोठी बहीण जर्मनीत होती, पूर्व जर्मनीत. तिचा नवरा , अहमद,
तिथल्या अफगाण वकिलातीत कोणी अधिकारी होता. तिचे आणि तिच्या चार गोंडस मुलांचे
फोटो तो अधून मधून दाखवत असे. थुई थुई नाचणाऱ्या कारंज्यापुढे थुई थुई नाचणारी ती
गोंडस पोरं. त्याची बहीण अगदीच बुरख्यात नाही,
पण तोंडावर रुमाल वगैरे बांधून. सय्यद सांगत होता आता त्या बहिणीला आणि
तिच्या कुटुंबियांना जर्मनीत रहाणं अशक्य आहे. जर्मन कम्युनिस्ट स्वीकारार्ह होते
पण बाहेरचे कम्युनिस्ट अजीबात नाही.
झालंच तसं. महिन्या भरात सय्यद
भरल्या डोळ्यांनी रूमवर आला. ही भिंत पाडायला पूर्व जर्मनितल्या कट्टर
कम्युनिस्टांचा विरोध होता. अशाच एका गटाच्या गुप्त सभेसाठी अहमद गेला होता. तिथे
विरोधी गटाचे लोक आले, बोलाचाली झाली, प्रकरण हमरीतुमरीवर आले. ह्या भडक
माथ्याच्या अफगाणाने खिशातून पिस्तुल काढलं,
पण त्या झटापटीत ते दुसऱ्याच कुणीतरी हिसकावलं, आणि पहिल्याच गोळीत याला टिपलं!
पुढे पूर्व आणि पश्चिम जर्मनीचं एकत्रीकरण झालं आणि ही आणि हिची चार पोरं जर्मनी
सोडून गेली. पोलंडमार्गे फ्रान्समध्ये आश्रयाला गेली, बहुतेक, पण नेमकं काहीच कळत
नव्हतं.
पुढे अफगानिस्तानात युद्धाचा
भडका उडाला. तिथे तालीबानचं राज्य आलं. नजीबला गाडीमागे बांधून रस्त्यात फरफटत नेत
ठार मारण्यात आलं. त्याच्या मृतदेहाचे धिंडवडे निघाले. लिंग कापून त्याचा मृतदेह
झाडाला लटकवला गेला. सय्यदच्या काळजाचं पाणी पाणी झालं. नजीब हा त्याच्या वडलांचा
दोस्त. लहानपणी नजीबच्या हवेलीवर खेळायला गेलेला हा. त्याचा पुतण्या याचा खास
दोस्त. नजीबला भर रस्त्यात फाशी दिल्याची बातमी आली आणि विस्फारित नेत्रांनी सय्यद
पहात राहिला. बातम्यातले फोटो पहात राहिला. अफगाणिस्तानात रक्तरंजित क्रांती झाली.
मुलतत्ववाद्यांचं सरकार आलं. नव्या सरकारचं आणि भारत सरकारचं सूत जुळेना. जुन्या
सरकारचे कारभारी काही दिवस दिल्लीच्या आश्रयाला राहिले पण त्यांनाही पुढे देश
सोडावाच लागला.
सय्यदचे आई-वडील तडकाफडकी
देश सोडून गेले. त्याला भेटूच न शकता! ते कुठे आहेत वगैरे काहीच बरेच दिवस कळेना.
फोन पत्रं काहीच नाही. मायभूमीची वाताहात, सतत युद्ध, आई-बाप गायब, विधवा बहीण
जर्मनीत का पोलंडमध्ये का फ्रान्समध्ये काही पत्ता नाही. हा इथे पुण्यात, इंग्रजी
आणि मेडिकलच्या अभ्यासक्रमाशी झगडतोय. पण सय्यद भलताच चिवट आणि खंबीर. या असाधारण
परिस्थितीबद्दल चकार शब्द कधी काढायचा नाही. मी विचारलं तर चार दोन शब्दांची
त्रोटक उत्तरं यायची. शेवटी मी नाद सोडून
दिला.
सिनेमाला गेलो एकदा. मीरा
नायरचा सलाम बॉम्बे. अंगावर येणारा सिनेमा. घरातून परांगदा झालेलं ते पोरगं, त्याच
नाव हरवतं, गाव हरवतं आणि मुंबईत मिळेल ते काम करून त्याचा जगण्याचा झगडा सुरू
होतो. ते पोरगं चहाच्या गाड्यावर हरकाम्या म्हणून कामाला लागतं. त्याला कोणी नाव
विचारत नाही की नावानं हाक मारत नाही. ‘ए च्या पाव’ हेच त्याचं नाव बनतं.
एकदा पोस्ट ऑफिस पाहून त्याला घरी पत्र लिहायची
उबळ येते. लेखनिकासमोर बसून तो मोठ्या उमेदीने मजकूर तर सांगतो, पण पत्ता
विचारल्यावर म्हणतो, ‘रामपूर’.
‘कुठले रामपूर?’ लेखनिक खेकसतो.
हा कोरा.
‘पत्ता माहित नाही तर पत्र
लिहून टायम बरबाद का केला माझा?’
त्याच्या डोळ्यात पाणी.
‘अरे कुठल रामपूर? भारतात
प्रत्येक जिल्ह्यात रामपूर असेल...’
हा गप्प.
तो लेखनिक पुन्हा पुन्हा
विचारत रहातो, हा हिरमुसला हिरमुसला होत जातो. मुसमुसत मुसमुसत, विझत-विझत जातो.
शेवटी वैतागून तो लेखनिक त्या पत्राचा बोळा करून फेकून देतो. कॅमेरा त्या
घरंगळणाऱ्या कागदी बोळ्यावर स्थिरावतो आणि ह्या प्रचंड मानवसमुहातल्या बेपत्ता
माणसांचं एकलेपण आपल्यावर भिरकावून देतो.
हे सगळं बघताना शेजारी
बसलेला सय्यद अगदी आतून हलल्याचं मला सुद्धा जाणवलं. त्याला सहनच होईना. उतू
येणारे दुखाचे कढ शेवटी बंध फोडून बाहेर आले. तो गदगदून रडायला लागला. त्याला
कसबसा सावरत सांभाळत मी होस्टेलला आणला. चार दिवस सय्यद घुमा. एका शब्दानं बोलेना.
चौथ्या दिवशी मला म्हणाला, ‘चार दिवस झोपलो नाहीये मी. झोपूच शकलेलो नाही.’ मला काय
बोलावं हेच सुचेना. पण ह्या भळभळत्या दुःखावर शर्तीली दवा त्याची त्यानीच शोधून काढली होती. त्या दिवशी
त्यांनी तो सिनेमा एकदा नाही , दोनदा नाही, तीनदा पाहीला. थेटरच्या अंधारात
मनसोक्त, मनमोकळं रडला तो. त्या दिवशी तो शांत शांत झाला. काळजातल्या दुःखाचा सगळा
गाळ एकदाचा उपसला गेला. रक्त वहातं झालं.
इतक्या वर्षात त्याला कधीही
कोणीही घरचं भेटायला आलं नाही की हा कधी सुट्टीत घरी गेला नाही. घर होतंच कुठे?
उध्वस्त आणि अस्वस्थ अफगाणीस्तान मधून
सारेच पांगलेले, परांगदा झालेले. आलाच तर माझ्याच घरी यायचा. मनसोक्त
रहायचा. गावातल्या ब्लड बँकेत आवर्जून रक्तदान करायचा. (केल्यावर न चुकता चक्कर
येऊन पडायचा!!) गमतीनं म्हणायचा, ‘तुझा अल्सेशिअन भॉव भॉव असं ओरडत नसून ‘गलाः
गलाः’ अशी मलाच हाक मारतोय!’ नदीकाठी घाटावर आम्ही गप्पा ठोकत बसायचो. त्याच्या
अफगाण वंशाचा त्याला कोण अभिमान. इराणी, दुराणी, सोमनाथ लुटणारा अब्दाली हे माझ्या
इतिहासातले खलनायक त्याचे स्फुर्तीदाते
होते. कोणी कोणी भारतावर कधीकधी आणि किती किती वेळा स्वाऱ्या केल्या;
कधीकधी, कसं कसं, कुठे कुठे आणि काय काय लुटलं; हे सगळं तो साभिमान बडबडत रहायचा.
माझा अफगाणीस्तान हा गांधारी, पठाणी व्याज, काबुलीवाला आणि पानिपतापुरता सीमित.
इराणी, दुराणी आणि अब्दालीला माझ्याकडे उतारा होता कुठे? पानिपतावरचा पुरता पराभवच
मला माहीत. मी आपला त्याच्या फुशारक्या सहन करत बसायचो. लढावू अफगाण जनता कधीही
पारतंत्र्यात गेली नाही हे ही तो छाती फुगवून सांगायचा. भारतातली जातीसंस्था हा तर
त्याच्या टीकेचा आवडीचा विषय. शिवाय भ्रष्टाचार, बेशिस्त, अस्वच्छता, निरक्षरता...
टीकेला विषय भरपूर होते त्याच्याकडे. खरी, खोटी, रंजित, अतिरंजित टीका. काही वेळा
बोचणारी, काही वेळा ओरखाडणारी, ओरबाडणारी रक्तरंजित टीका. एके दिवशी मी प्रतिहल्ला
करायचं ठरवलं. डायरेक्ट अफगाणी बायकांच्या बुरख्यालाच हात घातला. ही चाल कशी
असमानतेची, पुरुषी सत्तेची द्योतक आहे, ह्या मुळे बायकाना रेस्पिरेटरी इन्फेक्शन,
टी.बी. वगैरे कसा होतो, व्हिटामिन डी कसं कमी पडतं... वगैरे बरंच बरंच बोललो.
माझ्या बोलण्याचं त्याला भयंकर आश्चर्य वाटलं. असा काही दृष्टीकोन असू शकतो हे
त्याच्या गावीही नव्हतं. त्याच्या मते बुरखा ही स्त्रीच्या सौंदर्याला, वयात
येण्याला, मादकतेला, पुरुषांना आव्हान देणाऱ्या हालचालींना दिलेली मोकळी ढाकळी,
दिलखुलास, लाजवाब दाद आहे!! ‘तू बुरखा घाल बये, नाहीतर झालोच आम्ही घायाळ’, असं
सांगणं आहे! तुझ्या नखाचं दर्शनही आम्हाला विव्हल करतं असं दर्शवणं आहे!! बुरखा ही
अभिमानानं मिरवायची चीज आहे. स्त्रीत्वाचं लेणं आहे ते....!!! मी चांगला टराटरा
फाडलेला बुरखा सय्यदनं पुन्हा झटक्यात शिवून टाकला होता.
हळूहळू कॉलेजमध्ये सय्यद
समरसून गेला. लायनी मारण्यापर्यंत त्याचे प्रगती झाली. कॉलेज ऑर्केस्ट्राच्या वेळी
एक मुलगी त्याला अगदी बिलगून बसली होती. ती घारी, गोरी, अप्सरा त्याच्या मनात भरली
होती. त्याला छेडलं तर चक्क लाजला वगैरे. मी म्हटलं, ‘अवघड आहे सय्यद तुझं, तीचं घराणं
कडक धर्मनिष्ठ वगैरे आहे.’
म्हणतो कसा, ‘मला फक्त मजा करायची
आहे आणि तिलाही!’
सय्यद ऑड बॅचला गेला आणि
वहावत गेला, बहकत गेला. अभ्यासाची संगत सुटली. नवे छंद जडले, नवे फंद पडले. ‘क्रॉनिक’
(वारंवार नापास) मुलांबरोबर राहून राहून त्याला यात काही गैर वाटेनासं झालं. पण
पुढे हेही ग्रहण सुटलं. आपल्या बरोबरीची मुलं आपल्या बरीच पुढे गेलेली पाहून
त्याला शरम वाटू लागली. त्यांनी मग नेटानी अभ्यास सुरु केला.
दरम्यान वडलांची नियमित
पत्रं येऊ लागली. ते आता फ्रान्समध्ये होते. कुठल्यातरी संस्थेत प्राध्यापकी करत
होते. बहीणही तिथेच होती. पण इतकं सगळं होऊनही सय्यदची आणि कुटुंबियांची भेट होऊ
शकत नव्हती. याचा पासपोर्ट अफगाणिस्तानच्या पदच्युत सरकारने दिलेला. त्या सरकारला
युरोपीय देशांची मान्यता नव्हती, आताच्या सरकारचा पासपोर्ट त्याच्याकडे कुठून
येणार? असा काहीसा तो तिढा होता. त्याच्या वडीलांनी बराच काळ, बराच पत्रव्यवहार
करून हा प्रश्न मार्गी लावला. फायनलची परीक्षा पास होताच सय्यद साऱ्या
कुटुंबियांना भेटायला फ्रान्सला रवाना झाला. त्याच्या इतकाच आनंद आम्हा
मित्रांनाही झाला.
सय्यद आता इंग्लंड मध्ये
आहे. एका खेड्यात प्रॅक्टिस करतो. आईवडील फ्रान्समध्ये होते पण तिथलं वातावरण
अफगाणांसाठी चांगले नाही त्यामुळे आता इराणला आहेत, सय्यदच्या आजोळी. बहीणीनी आता एका
नायजेरीअन व्यापाऱ्याशी लग्न केलं आहे. ती असते मेक्सिकोत. सय्यदची बायको मूळची ऑस्ट्रेलियन,
लहानाची मोठी झाली सुदानमध्ये. ह्याला भेटली फ्रान्समध्ये. त्याची दोन गोजिरवाणी पोरं आहेत. तो आणि
मुलं मॅन्चेस्टर युनायटेडचे पक्के फॅन
आहेत. एकही मॅच चुकवत नाहीत. सारे फेसबुकवर भेटतात. येईन म्हणतो कधीतरी कॉलेजच्या
गेटटुगेदरला. गावीही यायचं असतं त्याला पुन्हा नदीकाठी गप्पा मारायला. काबुललाही जाईन
म्हणतो. शिवाय इराणला आजोळी, ऑस्ट्रेलियाला सासरी, मेक्सिकोला भाच्यांना
भेटायला...असं कुठे कुठे जायचं असतं त्याला... आता कुठे कुठे जातो आणि कधी
माझ्याकडे येतो ते बघायचं.