Wednesday, 11 October 2023

पाणी-पताची जिंकलेली लढाई

‘पाणी’पताची जिंकलेली लढाई 
डॉ. शंतनु अभ्यंकर. वाई. 
 
एखाद्याचे पानिपत होणे म्हणजे काय हे मराठी जनांना ठाउकच आहे. पण नुकतीच मी ‘पाणी’पताची लढाई  जिंकलो त्याची ही गोष्ट. 
त्याचं असं झालं की मला झालेल्या लंग कॅन्सरबद्दल एक दीर्घ लेख (आपुले मरण पाहिले म्यां डोळा) मी लिहिला. तो फारच प्रसिद्ध पावला. लोकप्रिय झाला. तो वाचून मला जसे अनेक सुहृद येऊन भेटले तसेच पहिल्या काही दिवसांतच काही पाणीविकेही  माझ्या दाराशी आले. पाणीविके  म्हणजे, पेशंट आणि नातेवाईकांच्या भावनांना हात घालत,  ज्या उपचारांत काहीही दम नाही असे उपचार अव्वाच्यासव्वा किंमतीला पेशंटच्या गळी मारणारे. सोन्याच्या मोलाने जणू पाणीच विकणारे. या साऱ्या अनुभवात अत्यंत दाहक आणि पिळवटून काढणारा अनुभव होता तो हा. संकटात सापडलेल्या, हळव्या लोकांना गंडवणे किती सोपे आहे हे माझ्या लक्षात आले. दाह झाला आणि पीळ पडला तो यामुळे.  मी डॉक्टर होतो, चालू उपचारांवर समाधानी होतो आणि चोख पुराव्या शिवाय काहीही मानणार नव्हतो म्हणून मी वाचलो. अन्यथा या ‘पाणी’पतावर मी निश्चितच धारातीर्थी पडलो असतो. 

माझ्या आयुष्याचे उघडे पुस्तक वाचून हे पाणीविके गिधाडांसारखे झेपावून येत होते. एकानी  फोन केला, आवाजात मार्दव, अजीजी.
‘सर, मी डॉक्टर अहमद शाह, तुमच्याशी बोलायचं आहे. काही महत्वाचे, प्लीज कधी येऊ?’
‘उद्या दवाखान्यात भेटू. चार वाजता काम संपतं माझं. तेंव्हा या.’
बरोब्बर पावणे चारला आवाज हजर. भेट होताच नमस्कार चमत्कार होताच आवाज बोलू लागला. सांगू लागला, ‘माझ्याकडे एक वनस्पतीची दवा आहे. कोणत्याही कॅन्सरवर अक्सीर इलाज.’ असं म्हणत त्यांनी एक रंगीत द्रावण असलेली बाटली माझ्या टेबलावर ठेवली. 
पहिलंच वाक्य ऐकून मी उडालो. एक डॉक्टर माणूस इतकं बेजबाबदार विधान कसं करू शकतो?
‘कोणत्याही कॅन्सरवर अक्सीर इलाज?’ मी जरा चढया सुरात विचारलं. 
‘हो’, त्याने आत्मविश्वासाने ओतप्रोत आवाजात सांगितलं. 
‘म्हणजे गायनॅकॉलॉजीतील कॅन्सरवर सुद्धा उपयुक्त असेलच?’
‘हो, शंभर टक्के! शेवटी कितीही झालं तरी अॅलोपॅथीला मर्यादा आहेत, नाही का?’ सुस्कारा टाकत तो म्हणला. 
‘अहो, मॅथमॅटिक्सलासुद्धा मर्यादा आहेत. म्हणून तर त्यात संशोधन होत असतं आणि नवे नवे शोध लागत असतात. मर्यादा नसलेलं असं कुठलं शास्त्र आहे? समजा असल्या मर्यादा तरी त्यामुळे तुमचं औषध गुणकारी कसं ठरतं?’, प्रयत्नपूर्वक शांत रहात मी विचारले.  
‘शेवटी अॅलोपॅथीला मर्यादा आहेत’, हे एक गंडवागंडवीचे विधान आहे. यांचे पाणी स्व-सामर्थ्यावर नाही तर दुसऱ्याच्या मर्यादांवर विकले जाणार असते. ‘शेवटी अॅलोपथीला मर्यादा आहेत’, यातून ‘आम्हाला’ मर्यादा नाहीत असं हळूच सुचवायचं असतं. शिवाय हे विधान, ‘अॅलोपथीला मर्यादा आहेत’, असं नसून  ‘शेवटी’ या विशेषणाने विभूषित आहे. ‘शेवटी’ या शब्दातून माणसाचा, प्रयत्नांचा असा कशाकशाचा शेवट ध्वनित होत असतो, एक हताशा ध्वनित होत असते आणि अशा ग्लानीत अभ्युत्थान करायला हे औषधी पाणी गुणी ठरतं असं हा माणूस सांगत होता.   
‘याचे काही स्टडीज, काही पेपर्स पब्लिश वगैरे झालेच असतील.’ मी. 
‘आयुषची औषधे आहेत ही. ह्यांना मार्केटिंगसाठी ट्रायल कंपलसरी नाही.’ 
‘क्काय?’
‘पण माझ्याकडे पेपर्स आहेत. मला वाटलंच, तुमच्यासारखा चिकित्सक माणूस हा प्रश्न विचारणार.’ असं म्हणत त्यांनी मराठी, हिन्दी वगैरे वृत्तपत्रांची काही कात्रणे असणारे जाड बाड माझ्या पुढ्यात ठेवले. पेशंटची खुषीपत्रे, त्या औषधाच्या जाहिरातीची कटींग,  आमदार खासदारांसोबत फोटो, हा माणूस अधिक पद्मिनी कोल्हापुरे, मकरंद अनासपुरे असे काही फोटो,   ऋषिकेश, हरिद्वार वगैरे पत्ते असलेल्या अगम्य विश्वविद्यालयांनी दिलेली सर्टिफिकिटे, ताईत असा बराच माल त्यात ठासून भरलेला होता. पण  त्यांचे औषध प्रभावी आहे याचा काडीमात्र पुरावा नव्हता.  
ते बाड बाजूला सरकवत मी विचारले, ‘हे नाही हो डॉक्टर, काही सायंटिफिक जर्नल्समधले पेपर वगैरे?’
‘आहेत तर, अख्खं पुस्तक आहे. अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स हॉस्पिटलमध्ये प्रयोग झाले आहेत. तिथे सगळे वापरतात.’ असं म्हणत, लेखक म्हणून एक भल्या भासणाऱ्या गोऱ्या माणसाचे चित्र असलेलं, एक पुस्तक त्यांनी पोतडीतून काढलं. मी लेखक परिचय, अनुक्रमणिका, इंट्रॉडक्शन, सगळं नीट पहिलं. भोंगळ आणि अतिरंजित दावे करणारी मराठी पुस्तके असतात, हे इंग्रजीत होते एवढेच.  त्या पुस्तकाला रेफरन्सेस (संदर्भ सूची) वगैरे कश्शाचा पत्ता नव्हता. त्यात नुसतेच दावेच दावे होते, पुरावे नव्हते.  
मी आता माझ्या की-बोर्डशी सरसावून बसलो. ‘हे नाही हो. त्यांची काही वेब लिंक? पिअर रिव्ह्यूड  पेपर्सच्या लिंक्स? क्लिनिकल ट्रायलचा डाटा? तुम्ही लिंक दिलीत तर मी आत्ता डाउनलोड करतो.’
तो गप्प. बरेचसे शब्द अगम्य असावेत असा. 
‘बरं ते अमेरिकन जाऊ दे. भारतीय औषध आहे ना? मग इथले काही संशोधन? त्याच्या लिंक्स?’
‘सर, आता काय सांगू तुम्हाला, इथे याची कुणाला किंमत नाही. मग बसा बोंबलत. आपल्या आयडिया चोरून ‘ते’ गबर होतायंत. अमेरिकेतून आलं की आता सगळे खरं  मानतात.’ पुस्तक नाचवत तो म्हणाला. 
‘नाही, तसं नाहीये. अमेरिकनांनीसुद्धा एव्हिडन्स दाखवल्याशिवाय मी नाही मानत खरं.’
‘अहो, काळाच्या कसोटीवर उतरलेली औषधं ही, त्याला कशाला हवा एव्हिडन्स?’
‘काळाची कसली हो कसोटी? मंत्राने विष उतरवणे हे काळाच्या कसोटीवर टिकलेलंच होतं. पण अॅंटी स्नेक व्हेनम इंजेक्शन आलं आणि आता साप चावल्यावर मंत्रोपचार करणं नुसताच गाढवपणा नाही तर गुन्हा आहे. डॉक्टर, लक्षात घ्या, काळाची  कसोटी वगैरे भ्रामक आहे. एखादी पद्धत दीर्घकाळ टिकली म्हणून ती उपयुक्त ठरतेच असं नाही. विज्ञानाचीच कसोटी खरी. निरुपयोगी गोष्टी काळाच्या ओघात लुप्त होतात हे संपूर्ण सत्य नाही.’
‘तुम्ही आता काहीच इंटरेस्ट दाखवत नाही म्हटल्यावर, काहीच बोलता येणार नाही मला.’ 
‘इंटरेस्ट नाही कसा, सगळ्याच कॅन्सरवर काम करतं म्हणताय हे औषध, ही तर खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ते कसं, ते तरी सांगा.’ 
सोप्पा प्रश्न आला असं समजून त्यांचा चेहरा खुलला. 
‘अहो ह्याने इम्यूनिटी वाढते.’ त्यांनी सुरू केले. ‘सगळ्याच ऑर्गन्सची प्रतिकार शक्ती वाढते. अगदी मूळापासून. आतून स्ट्रॉंग होतो माणूस.  त्यामुळेच तर हे कोणत्याही कॅन्सरवर गुणकारी आहे.’ 
‘पण इम्यूनिटी कशी मोजायची? त्याचं काही युनिट आहे का?’
गप्प. 
‘तसे तरी अभ्यास तुमच्याकडे आहेत का?’
गप्प. 
‘निव्वळ तुम्ही म्हणता म्हणून मी हे औषध का घ्यायचं?’
‘नाही, नाही. हेच फक्त घ्या असं नाही. तुमचं नेहमीचं औषध चालूच ठेवायचं आहे. ते अजिबात बंद करायचं नाही. हे पूरक म्हणून घ्यायचं. अत्यंत चांगले रिझल्ट आहेत सर. मी स्वतः एकदम फोर्थ स्टेज कॅन्सरचे शेकडो पेशंट बरे केले आहेत. ही विद्या आहे सर, गुरूंनी बजावले होते, फार गवगवा करू नकोस. जे घेणार नाहीत त्यांचेच नुकसान आहे. तुम्ही म्हणून मी हे सगळे पेपर दाखवले, एरवी मी जास्त बोलत नाही. द्या म्हणतील त्यांना औषध द्यायचं, नको म्हणाले तर राहिलं. पैशाची काही घाई नाही सर. एक महिन्याच्या औषधाला पंचवीस हजार लागतात. एका महिन्याचे घेतले की वर एक महिना फ्री.’ 
त्यांच्या बोलण्यातली  खोच माझ्या लक्षात आली. तुमच्या आली का? खरंतर आम्ही तुमच्या भल्याचं, म्हणून सांगतोय पण तुम्हालाच स्वतःचं भलं करून घ्यायचं नसेल तर राहिलं; अशा आविर्भावात तो बोलत होता. अशा सुरात कोणी काही बोललं की माणूस थोडा विचलित होतो. विकल अवस्थेतला आदमी  तर होतोच होतो. ती  आशेची ज्योत तो फुंकून टाकू धजत नाही. आणि इथेच पाणी विक्यांचं फावतं. मग ते म्हणतात, ‘तुम्ही वापरुन तर बघा. गुण नाही आला तर पुन्हा घेऊ नका?’ 
मग माणसं म्हणतात, ‘घेऊन तर बघू.  महिनाभर घेऊ, आला गुण तर आला.’ माणसांना वाटतं हे बेस्ट आहे. औषध पुन्हा न घेण्याचं स्वातंत्र्य आहेच की. पण निरुपयोगी औषध एकदाही न घेण्याच्या त्यांच्या अधिकाराचं काय? 
मी चिडलो. ‘अहो वापरुन काय बघा, तुम्हीच ट्रायल करून इफेक्ट, साईड-इफेक्ट सगळं आधी सांगायला पाहिजे. इतका वेळ मी तेच तर पेपर्स दाखवा म्हणतोय. मी वापरलं आणि मला जरी खडखडीत बरं वाटलं, तरी एखाद्या केसने काहीच सिद्ध होत नाही. डॉक्टर, तुमच्या लक्षात येतंय का? वापरुन तर बघा हा  शास्त्रीय युक्तिवाद नाही. सामान्यांना फशी पाडणारं   मार्केटिंग गिमिक आहे.’ इतकं बोलूनसुद्धा ते आवरते घेईनात. चिकाटी आणि लोचटपणाच्या सीमेवर ते काही काळ घुटमळले आणि त्यांनी  लोचटपणा सुरू केला. 
‘घ्या हो, गुण येणार म्हणजे येणार. नॅनो टेक्नॉलॉजी आणि क्वांटम मेकॅनिक्सची कमाल आहे ही. नाहीतरी विज्ञानाला कुठे सगळ्या गोष्टी कळल्या आहेत? तुमच्या सायन्सला लिव्हिंग बॉडी आणि डेड बॉडी यातील फरक नाही सांगता येत.’ गडी आता पेटला होता. एकीकडे सायन्सला अडाणी ठरवत दुसरीकडे तो नॅनो-क्वांटम शपथा  घेत होता. 
‘पण विज्ञानाला सगळं कळलं नाही, म्हणून हे घ्या, हा कुठला तर्क? विज्ञानाला सगळं कळलं असं कधीच होणार नाहीये. प्रश्न फक्त तुम्हाला तुमच्या विधानांसाठी काही पुरावा देता येतोय का, एवढाच आहे.’
‘आमच्या गुरूंनी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा आणि टाटा कॅन्सरचे डॉ. वालीया ह्यांना बरे केले होते.’ 
पुन्हा एकदा माझा प्रश्न टाळून त्यांनी नवे असंबद्ध विधान केले. माझ्या प्रश्नाचे उत्तर नाहीच. मी गाडी पुन्हा रुळावर आणली.  
‘पण गुण येणार म्हणजे नक्की काय होणार? इम्यूनिटी वाढल्याचे कळणार कसे?’ आता डॉक्टर जरा गप्पसे झाले. ‘सध्या तर जे औषध चालू आहे ते मला लागू पडले आहे. मला काहीच होत नाहीये. मग माझ्यात सुधारणा काय होणार? फरक काय पडणार?’
‘तसं नाही सर, तुम्ही घेतलेत की तुम्हाला आपोआप जाणवेल, आपोआप बरं वाटायला लागेल. तुमचं तुम्हीच सांगाल की फरक वाटतो आहे.’ 
‘अहो डॉक्टर, यालाच तर प्लॅसीबो इफेक्ट (इष्टाशा परिणाम) म्हणतात. औषध आहे असं सांगून पाणी जरी दिलं तरी बहुतेक रुग्ण, ‘आता जरा जरा वाटतंय हं बरं’, असं सांगतात.’  याही रुग्ण मानसिकतेचा प्रयोग हा पाणीविक्या माझ्यावर करू पहात होता.  ‘तुमच्या औषधाचा परिणाम हा प्लॅसीबोपेक्षा सरस आहे हे दाखवावं लागतं. त्याचेच स्टडीज आहेत का हे विचारतोय मी मघापासून. जर सगळे कॅन्सर बरे करणारं  औषध आहे तर गुरूंना नोबेल प्राइज मिळायला हवे. तुम्ही सिद्ध करून दाखवलेत तर तुम्हालाही मिळेल की.’ 
अचानक  त्याच्या चेहऱ्यावर अष्टसात्विक भाव पसरले आणि तुच्छतेने तो म्हणाला, ‘नोबेलची चिंता कुणाला? या बाकी जगाला नोबेलची चिंता. मी काय, माझे गुरु काय, आम्ही पोहोचलेली माणसं. आम्ही हे नफा म्हणून नाही तर सेवा म्हणून करतो. विद्या विकायला नाही काढली आम्ही. मेवा नकोय आम्हाला. माती आणि सोने आम्हां समान ते चित्ती!!’ असं म्हणत त्याने तुकारामालाही हौदयात खेचला. मला मात्र, ‘तुका म्हणे ऐसे मायेचे मविंद (लोभी), त्या माजी गोविंद नाही नाही’, हा चरण आठवला.  नोबेल हे पारितोषिक आहे, नफा नाही, हे त्याला कोण सांगणार?
मी जरा भडकलो. ‘अहो, मी गेली ३० वर्षं या क्षेत्रात आहे. दरमहा मी गायनॅकॉलॉजीची  निदान तीन जर्नल्स नियमितपणे वाचतो.  तुमच्या इतक्या महत्वाच्या शोधाची माहिती ह्या लंगोटी पेपरमधून नाही तर जर्नल्समधून यायला हवी. टेक्स्ट बुक्स मधून यायला हवी. इतका महत्वाचा शोध इतका दुर्लक्षित कसा?’ 
आता त्यांनी बिच्चारे असल्याचा आव आणला. ‘तुम्हाला तर माहीत आहे, औषध कंपन्यांची लॉबी असते सर.  म्हणून सगळं दाबून टाकतात. कुठे पेपर येऊच देत नाहीत. ‘हे’ औषध आलं की त्यांची सद्दी संपणार.’
‘सद्दी कशी संपेल? ह्या दिव्यौषधीला मागणी आहे म्हटल्यावर कंपन्या हे विकून नफा कमावतीलच  की. तुम्ही सुद्धा हे विकताच आहात. फुकट थोडेच वाटताय? तुम्ही सुद्धा नफा कामावताच आहात. ‘पोचलेले’ असलात तरीही. उलट शास्त्रीय पुरावा दिलात तर जगभरातले डॉक्टर लिहितील हे औषध. पुण्य कमावण्यासाठी तुम्हाला विश्वाचे आंगण आंदण मिळेल.  निव्वळ भारतीय पेशंटचं भलं का करताय? तुमचाही फायदा होईल.’ 
‘सर, हे तर होईलच. आता आपल्याला सरकारी पाठींबाही भरपूर आहे. पण तुम्ही फारच चिकित्सक आहात बुवा, हे पहा, आपल्याला लॉन्ग टर्म रिझल्ट हवेत का शॉर्ट टर्म?’
हा प्रश्न खरंतर निरर्थक होता. यातील एक पर्याय हा असून नसल्यासारखाच होता. भूक लागल्यावर, तुम्हाला अर्धपोटी रहायचं आहे का पोटभर जेवायचं आहे?, असं विचारल्यासारखं आहे हे. 
‘मला रिझल्ट आहेत आणि सध्याच्या ट्रीटमेंटपेक्षा सरस आहेत याचा पुरावा हवा आहे. टर्मचं नंतर बघू.’
अर्थात त्यांच्याकडे पुरावा नव्हताच. तो का नाही, याच्या हजार लंगड्या सबबी मात्र होत्या. मला त्या डॉक्टरांचं हळूहळू कौतुक वाटायला लागलं. पाणीविक्यांचे सारे कुटील मार्ग त्यांना अवगत होते. ‘खुषीपत्रे’ हाच पुरावा, व्यक्ति ‘पोचलेली’ असणे, ‘गुण येणार’ याची गोलमाल व्याख्या, ‘इम्यूनिटी वाढेल ही थाप, जॉन होपकिन्स, क्वांटम, नॅनो अशी शब्दसाखर पेरणी, ‘वापरुन तर पहा’ हा मंत्र....ही काही उदाहरणे. 
असे अनेक पाणीविके आले आणि गेले. काहींना अक्षरश: हाकलून द्यावे लागले. भीडभाड न बाळगता यांच्या पहिल्या वाक्यापासून माझे स्पष्ट मत मी मांडायला शिकलो.  सुरवातीलाच ढील दिली की नंतर हे प्रकरण तापत जातं आणि आपल्यावरच शेकतं, असा माझा अनुभव आहे. कधी यात  मल्टी लेवल मार्केटिंग असतं. तुम्ही नवीन गिऱ्हाईक गटवलंत तरच तुमची गुंतवणूक परत.  अशी मंडळी अगदी घायकुतीला येऊन मार्केटिंग करतात.  
आता अमुक दिव्य औषध घ्या, व्याधी गायब; दूध सोडा, कॅन्सर तुम्हाला सोडेल; फक्त कच्चं खा, अॅंटी ऑक्सिडेंट्स आजाराला कच्चं खातील; वॉटर एनिमा घ्या, सगळं फ्लश होऊन जाईल; असलं कोणी काही म्हटलं रे म्हटलं की मी सांगतो, त्याचे सर्व रेफेरन्स मला मेल करा. मी वाचतो. मग बघू. पुढे तो माणूस जितक्या वेळा  ‘घ्या’ म्हणेल तितक्या वेळा  मी ‘रेफेरन्स पाठवा’ हेच म्हणतो. लवकरच पीडा टळते. रेफेरेन्सचे एकही मेल आलेलं नाही. 
मी चांगला शिकलेला, याच क्षेत्रातला तज्ञ पण मलाही विचलित करू पाहणारी कित्येक अस्त्र त्यांच्याकडे होती. सामनेवाला तर अगदी तयारीचा होता. 
‘फायदा नाही असं समजा पण औषध घेण्यात तोटा तर काही नाही ना?’ त्यांनी आणखी एक अस्त्र काढलं.
मी वैतागून तावातावाने बोलू लागलो. 
‘माझा काहीही नाही कारण मी घेणारच नाहीये. पण तुमच्या इतर गिऱ्हाईकांचा नक्कीच तोटा होत असणार. पुरेसा पुरावा नसलेलं  औषध ते  घेणार, आपलं भलं होतंय या भ्रमात राहणार, हे स्वस्त आणि पॉवरबाज आहे ह्या समजुतीने मूळ उपचार बंद करणार, तुम्हाला पंचवीस हजार देणार आणि मारुतीच्या बेंबीत बोट घातलंय म्हटल्यावर गार वाटतंय म्हणून सांगत तुम्हाला नवीन गिऱ्हाईकाची सोय करणार.. हे सगळे तोटेच आहेत. याहूनही भयानक म्हणजे तुम्ही आधुनिक उपचारांबद्दल लोकांच्या मनात भयशंका पेरता. शंका हा तर संशोधनाचा पाया आहे. विज्ञानात सारेच साऱ्यांना तपासत, तपासतच पुढे गेले आहेत. पण तो माहौल वेगळा आणि तुमच्या मार्केटिंगसाठी तुम्ही निर्माण केलेले विज्ञान-भय, केमिकल-भय आणि अॅलोपॅथी-भय वेगळे.’ 
त्याच्या तोफा आता थंडावल्या. सारा दारुगोळा संपून गेला असावा. हा माणूस इतके तर्कदुष्ट बोलत होता की तो डॉक्टर नसावा अशी माझी खात्री पटत चालली होती. मग मी त्याला त्याबद्दल विचारले. पण माझी घोर निराशा झाली. तो खरंच डॉक्टर होता!! नाव होतं डॉ. अहमद शाह. मला मजा वाटली. अहमदशाह दुराणी-पानिपत-पराभव असे सगळे संदर्भ आठवून हसू आले. ‘पाणी’पताची ही लढाई तर मी एकहाती जिंकली होती. 
टेबलवरची रंगीत पाण्याची बाटली उचलून त्याने अफगाणिस्तानकडे कूच केले आणि मी,  एकांडा विजयी मराठा वीर, चहा पिण्यासाठी पुण्याकडे घोडं दामटलं!!!

प्रथम प्रसिद्धी
अनुभव
ऑक्टोबर 2023