मंगलाताई नारळीकर गेल्या.
अगदी काही वर्षांचीच आमची ओळख. देख तर एकदाच. त्या डॉ.जयंतरावांबरोबर वाईला आल्या होत्या. मी त्यांना उत्साहाने माझी पुस्तकं दिली. निव्वळ सत्कृत्य भावनेने. पण लिखाण आवडल्याचं आवर्जून कळवलं त्यांनी.
नंतर फक्त पत्र-भेट. पण इतक्या थोडक्या कालावधीत, आदरणीय सौ. मंगलाताई नारळीकर यांस कृ.शी.सा.न.वि.वि. पासून, माय डियर मंगलमावशी पर्यंत मायने बदलत गेले. ह्याचे श्रेय त्यांचे.
दबक्या ओळखीच्या सुरवातीच्या दिवसांत त्यांचं एक पत्र आलं, थोडं दम भरणारं, दडपून टाकणारं पण प्रेमळ.
डॉ. शंतनु अभ्यंकर यांना नमस्कार,
तुमचे ‘ किशोर ‘ मध्ये प्रसिद्ध झालेले लेख कल्याणी अभ्यंकर गाडगीळ हिच्याकडून आले. तिने त्या लेखांच्या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली.
वास्तविक आपला परिचय आहे, तुम्ही वाईमध्ये एका कार्यक्रमाच्या वेळी येऊन भेटलात, तुमची पुस्तके दिलीत. ती आवडल्याचे देखील तुम्हाला कळवले होते. मग तुम्ही कल्याणीला मध्यस्थ का घेतलं? थोडक्यात, JVN is slightly irritated.
आता या लेखांबद्दल काय अपेक्षा आहे, ते तुम्हीच कळवा. JVN सहसा प्रस्तावना लिहित नाहीत.
आपली,
मंगला नारळीकर.
मी चपापलो. मी त्यांना उभयतांना अप्राप्य समजत होतो आणि ते मला आप्त. मग पत्रोत्तर लिहिणे आलेच..
आदरणीय मंगलाताई नारळीकर यांस,
कृ. शी. सा. न. वि. वि.
सर्वप्रथम झाल्या प्रकाराबद्दल मी सपशेल माफी मागतो.
आपला परिचय आहे आणि माझ्या लिखाणाबद्दलचे आपले अभिप्राय मला पोहोचले आहेत.
म्हणूनच आपल्याला आणि सरांना प्रस्तावनेची विनंती करावी असा विचार माझ्या मनात आला.
एकीकडे ज्यांच्याकडून मी लेखन, वाचन, भाषण वगैरे बाबत स्फूर्ति घेतली, मराठी-प्रेम शिकलो, त्यांच्याकडून प्रस्तावना मिळण्याची शक्यता मला खुणावत होती पण अशा गोष्टींविषयीची सरांची उदासीनताही मी ऐकून होतो. पण त्याचवेळी मुलांपर्यंत निव्वळ विज्ञान नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोन पोहोचवणारे हे लिखाण तुम्हालाही महत्वाचे वाटेल असं सतत वाटत होतं.
अशा द्विधा मनस्थितीत असल्याने मी कल्याणी गाडगीळ यांच्यामार्फत चाचपणी करायची ठरवली.
आपला अनमान म्हणून नाही पण आपल्याप्रती असलेल्या आदरापोटी थेट विनंती मला करणे मला धाडसाचे वाटले. बस इतकेच.
झाली गुस्ताखी माफ करून, आपण उभयतां या पुस्तकातील विचारांचे महत्व विशद करणारी प्रस्तावना दिलीत तर या उपक्रमाला आणखी उभारी मिळेल.
डॉ. शंतनू अभ्यंकर
उलट मेली मेल आली…
डॉ शंतनु अभ्यंकर यांना नमस्कार,
JVN ना मी त्यांची प्रतिक्रिया विचारली, त्यांनी सांगितली, मी लिहून काढली. माझीही प्रतिक्रिया कळवत आहे. सोबत दोन्ही जोडत आहे.
तुमचे लेख वाचायला, समजायला सोपे, रसाळ भाषेत , पटणारी उदाहरणे देणारे आहेत. तुम्ही हे विज्ञानप्रसाराचे किंवा खरे तर विवेकी विचार शिकवणारे काम चालू ठेवावे.
आपली ,
मंगला नारळीकर.
मग परस्परांचे लिखाण वाचत गेलो, परस्परांना कळवत गेलो.
सप्रेम नमस्कार,
‘ लोकसत्ता चतुरंग ‘ मधील आपला लेख आवडला, पटला पण त्याहूनही भावला तो त्यातील सौम्य भाषा वाचून.
अतिशय अनाग्रहीपणे आपले मुद्दे मांडतानाही इथे ते अतिशय ठामपणे मांडले गेले आहेत.
आपल्या लिखाणातून खूप काही शिकायला मिळालं.
आपला नम्र
डॉ शंतनु अभ्यंकर वाई
पुढे १८ डिसेंबर च्या ‘ लोकसत्ता लोकरंग' मधला माझा लेख (असला कोणी नास्तिक तर बिघडलं कुठे?) आवडल्याचं कळवताना त्यांनी लिहिलं…
चार्वाक, जैन तत्त्वज्ञान, बुद्धाचा निरीश्वरवाद यावर आपल्याकडे फारशी माहिती नसते. ती व्हायला हवी.
आपल्या किंवा खरे तर कोणत्याही देशाच्या संस्कृतीमध्ये धर्माचा औदुम्बर जळात पाय सोडून बसलेला दिसतो. बहुतेक देशात, विविध काळात, देवकल्पना आवश्यक वाटली होती व ती बरीच फोफावली. तिच्या आधाराने
नीतीनियम समाजात दृढ करण्याचा प्रयत्न झाला. याची कारणे शोधून त्यांचे समाधान असत्य आणि अन्याय याचा अवलंब न करता , अन्यथा करता येईल का याचा अभ्यास हवा. स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या भारतात हे साध्य व्हावे.
मंजना.
त्यांची भूमिका अतिशय सौम्य आणि समजूतदार होती. धर्म आणि संस्कृतीचे हे दाट मिश्रण हा त्यांच्या अभ्यासाचा विषय. एका पत्रात त्या लिहितात…
…आपली संस्कृती एवढी जुनी, टिकून राहिली, ती जुन्या काळाच्या मानाने प्रगत असू शकेल. पण आता, ज्ञानात प्रचंड भर पडली आहे. सत्याधारित विज्ञान व विवेक , दोन्हींचा उपयोग करून आपले सामाजिक व धार्मिक नियम बनवायला हवेत. स्वातंत्र्य आणि समता सर्वाना उपलब्ध असणे या आदर्शाकडे जायला हवे.
लोकांना सण, उत्सव, समारंभ साजरे करायाल, मौज मजा करायला आवडते. त्यासाठी धार्मिक प्रतिमांचा आधार थोडासा असायला हरकत नाही. पण ती प्रतीके आहेत, खरोखर आपल्या सृष्टीवर त्यांचा काही अंमल नाही, हे मान्य करायला हवे. एखाद्या देव किंवा देवी चा उत्सव करण्यापेक्षा ऋतुकालानुरूप निसर्गाचे पूजन करणे योग्य वाटते.
जगातल्या जवळपास सगळ्या संस्कृती कोणता तरी देव मानून त्याच्या आधाराने सामाजिक नियम बनवून समाज बांधणी करत आल्या. त्यावरून मोठ्या समाजासाठी लोकांना देव या कल्पनेचा आधार, कदाचित धाक दाखवण्यासाठी लागतो असे दिसते. तो आधार असत्य गोष्टींचा नाही ना, जास्तीत जास्त लोकांना न्याय देणारा आहे ना हे वारंवार तपासायला हवे.
देवाचा आधार निराशेच्या काळात माणसाला आश्वासन, आशा, देण्यासाठी उपयोगी दिसतो. जसे लहान मूल आपले दु:ख किंवा अडचण आई वडिलांच्या पुढे मांडले की मदत मिळणार असे आश्वासन मिळवते, तसा प्रयत्न मोठी माणसे करतात. प्रत्येक वेळी आई वडील मागणी मान्य करतातच असे नाही, हेही मुलाला अनुभवाने कळते. तरी आपला भार देवावर टाकून थोडे मानसिक समाधान मिळतेच. म्हणून देवाला रिटायर करण्याऐवजी, त्याच्या मर्यादा समजावून घेणे आणि निसर्ग नियमांच्या विरुद्ध न जाता, कोणावर अन्याय न करता , देवाचा आधार घेणे मान्य असावे.
आपल्या पुराणग्रंथांतील सगळीच विधाने सत्य आणि ग्राह्य नसतात. अतिशयोक्तीचा भरपूर वापर केलेला असतो. आपण नीरक्षीर विवेक करून चांगलं, हितकारक तेवढं उचलावं, हे मी शिकले.
तत्वज्ञान फार झाले. पण समविचारी माणसांशी बोलणे आनंददायी असते.
मंगला नारळीकर
मग अचानक बातमी कळली. त्यांनाही लंग कॅन्सरने गाठलं होतं. आम्ही दोघे समानशील तर होतोच आता समान व्याधीबाधितही झालो. एक वेगळच नातं झालं तयार. सुमारे ४०वर्षापूर्वी त्यांना ब्रेस्ट कॅन्सरने ग्रासलं होतं. ऑपरेशन- केमो – रेडिएशनने त्यांना बरं वाटलं पण ३५ वर्षांनी हे दुखणं पुन्हा उपटलं. त्यातूनही त्या बऱ्या झाल्या आणि मग आता लंग कॅन्सर.
हा सारा अनुभव त्यांनी शब्दबद्ध केला होता. ते वाचताच मी उत्तर लिहिले…
सविनय नमस्कार,
एका समानधर्मा, विज्ञानवादी, विदूषीचे लखलखीत विचार वाचून भरून पावलो.
विचारांचे हे माणिक-मोती, त्यांची प्रभा माझ्यासकट अनेकांना मार्गदर्शक ठरेल.
मी 58 वर्षाचा आहे आणि नुकतेच मलाही लंग कॅन्सरने गाठलं आहे. उपचार चालू आहेत. त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम अनुभवतो आहे. पण या प्रवासात हा लेख उभारी देणारा आहे.
डॉ शंतनु अभ्यंकर, वाई
केवळ मलाच नाही तर त्यांच्या अनेक सुहृदांना हा लेख मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरला होता. अशाच एकीची, त्यांच्यासारख्याच ब्रेस्ट कॅन्सरग्रस्त मैत्रिणीची प्रतिक्रिया देखील त्यांनी शेअर केली होती…
मंगल,
तुझ्यासारखी प्रगल्भ मैत्रीण माझ्या आयुष्यात आली याचा मला पूर्वीपासून, अगदी बालपणापासून अतिशय अभिमान वाटत आलेला आहेच, पण आज तुझं हे मोकळं मनोगत वाचून तो शतपटीने वाढला आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे आज तू आणि मी एकाच बोटीतून प्रवास करत असताना आपापल्या परीने या दुर्धर रोगाला कशा सामोऱ्या जात आहोत याची मनोमन तुलना करून मनाशी काहीएक दृढ निश्चय करायला तू मला मदत केली आहेस आणि प्रेरणाही दिली आहेस हेच आहे.
तू या गंभीर आजाराशी बराच काळ सामना दिलास. त्या मानाने माझी साडेसात वर्षं म्हणजे कमीच म्हणायला हवीत, पण वेदना आणि उपचार यांत काहीही फरक नाही. तीच ऑपरेशन्स ( रॅडिकल मॅस्टेक्टॉमी ), तीच ॲग्रेसिव्ह कीमोथेरपी, तेच रेडिएशन, तीच पॅलिएटिव्ह केअर – सगळं सगळं तेच आणि तसंच. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुझा आणि माझा या सगळ्याकडे पाहण्याचा एकसारखाच दृष्टिकोन.
मुख्य म्हणजे आपण खुल्या दिलाने या वस्तुस्थितीचा स्वीकार केलेला आहे. खरंच, तू मला खूपच आधार दिला आहेस. अशीच प्रसन्न राहा आणि मलाही प्रसन्न राहायला मदत कर.
तुझी मैत्रीण
मग फोन पत्र चालू होते. एकदा, कशा आहात?ला उत्तर म्हणून त्यांनी पॅलीएटिव्ह केअरवर असल्याच कळवलं.
प्रिय शंतनु,
तू बरा आहेस आणि पुन्हा कामही सुरू केले आहेस हे वाचून बरं वाटलं. शाब्बास रे.
मी आता पॅलीएटिव्ह स्वाधीन झाले आहे. अशक्त आहे, मधुन मधुन ओ टू लागतो. सतत मदतीला माणूस लागतो. पण माझी तक्रार नाही उलट मिळणाऱ्या मदतीबद्दल मी कृतज्ञ आहे. ३७वर्ष कॅन्सरची सोबत असताना, आता ऐशीव्या वर्षी अधिक हाव धरू नये.
एक सल्ला मात्र देते.. धक्कादायक
विवेकी, बुद्धीप्रामाण्यवादी विधानांनी लोकांना दचकवण्यापेक्षा त्यांना तसा विचार करायला शिकवणं, जास्त महत्त्वाचं आहे.
मंगला
कीबोर्डवरच्या बोटांची वृद्ध, प्रेमळ, अशक्त पण अनुभवसमृद्ध थरथर मला स्क्रीनवर वाचतानाही जाणवत होती. मी उत्तर टाईपलं…
मंगल मावशीस,
सा. न.
…आयुष्यात खूप खूप पूर्वीच आपण भेटलो असतो तर…
शंतनु