दुस्तर हा घाट...
डॉ.शंतनु
अभ्यंकर, वाई.
हा घाट वाई ते
पाचगणी. नाव पसरणीचा घाट. तो माझ्या गावच्या वेशीलाच सुरू होतो आणि पाचगणीच्या वेशीशी
संपतो. हा अगदी परिचयाचा. तरीही अवज्ञा न झालेला. शेकडो वेळा वर-खाली केलं
असेल मी. डोळे मिटूनसुद्धा मी या घाटातून गाडी
चालवीन इतकी ही वाट माझ्या चाकाखालची. एका
ठाय लयीत, एकाच कोनात, डोंगराच्या कडेवरून, मुरकत, गिरकत, लवत, चढत जाणारी ही वळणवाट.
वाट म्हटलं तर
रोजचीच. तीच वळणे, तोच रस्ता, तोच कट्टा; मैलाचे तेच दगड आणि मधोमध तोच तुटक
पांढरा भस्माचा पट्टा. पण या घाटाने कित्येक साक्षात्कारी क्षण, विलक्षण अनुभूती
आणि कायमची स्मृतीलेणी दिलेली. पायी
फिरताना थंड वाऱ्याच्या चवऱ्या ढाळणारा, संथपणे ड्रायव्हिंग करताना कविता
सुचवणारा, पावसात निथळताना हिरवेकंच वैभव उधळणारा; मात्र सदैव आपल्याच तंद्रीत
चालणारा, हाच तो घाट.
यातले काही टप्पे,
काही खुणा इतकी वर्ष झाली तरी तशाच. घाटाच्या कुशीत शिरतानाची, रस्त्यालगतची, वडा पिंपळाची
झाडं. त्यांची खोडं जख्ख म्हातारी. पारंब्यांच्या जटा फुटलेली. पण वडा-पिंपळाला कोवळी
पालवी फुटते आणि ते झाड तारुण्याने न्हाऊन निघते. रक्तशामल पालवीतून, चढते उन,
डोकावून बघते आणि लाल-गुलाबी, पोपटी-हिरव्या छटांनी ती झाडे माणिक-पाचू मिरवत, मंद
वाऱ्यावर सळसळत, लखलखत रहातात.
मोरपिसाऱ्याचे प्रचंड, त्रिमितीत केलेले ब्लो-अप असल्यासारखी दिसतात. पुढे लाललाल
फळं आल्यावर तर बहिणाबाईंचे, ‘राघु चोची विसरले’, हे आठवल्याशिवाय पुढे जाणेच
अशक्य.
काही वळणं गेल्यावर
पसरणीचा फाटा, मग ‘पहिले वळण’. म्हणजे मोठी अक्कडबाज वेलांटी घेऊन वळणारा रस्ता. वाईकरांचा
हा फिरण्याचा एंड पॉइंट. इथे थोडा वेळ बसायचं, चार हातवारे करायचे, त्यालाच व्यायाम
म्हणायचं आणि उताराला लागायचं; हा बहुतेकांचा नेम. आणखी चार लाजरीबुजरी वळसे-वळणं झाली की मग ‘दुसरं वळण’. काही उत्साही
वाईकरांचा फिरण्याचा हा एंड पॉईंट. इथेही तसेच. इथे पोहोचून हुश्श करून जरा टेकावं.
चांगलं ताठ बसून चार वेळा श्वास घ्यावा, चार वेळा सोडावा. त्यालाच प्राणायाम
म्हणावे, जरा डोळे मिटून जग आपल्याकडे पहात नाहीये अशी समजूत करून घ्यावी, त्यालाच
समाधी म्हणावे आणि पुन्हा परतीला लागावे.
मग काही वळणं गेल्यावर
येतो तो बुवासाहेब. हा या घाटाचा देव. म्हणजे ह्या घाटातल्या गाडीवानांचा देव. दर अमावस्येला
त्यांची टेम्पो, टमटमसह गर्दी. गाडीला नारळ, लिंबू-मिरची, हळद-कुंकू,
बुवासाहेबाला जंगी पूजा आणि ‘माल्कानला’ तीर्थ-परसाद. दुसऱ्या
दिवशी घाटात कोंबड्यांची पिसं, द्रोण-पत्रावळी आणि काचेचे काही विशिष्ट आकाराचे पोकळ
तुकडे!
काही वळणे
ओलांडली की, उंच उंच उडणारे सापमार गरुड दिसायला
लागतात. त्या गरुडांशी स्पर्धा करणारे साहस हौशी पॅराग्लायडर्सही, त्या अथांग
निळाईत झेपावलेले असतात. त्यांच्या रंगीबेरंगी छत्र्यांचे प्रचंड, टपोर,
अर्धफुलोरे त्या काळ्याकरड्या गरुडांना जणू वेडावून दाखवत असतात. स्टेपी इगल हे रशियन पाहुणेही या पर्यटनस्थळी
येतात. टेबललँडच्या कड्याकपारीत त्यांची घरटी आहेत. नेमकी कुठे आहेत ते माझा मित्र
सांगायला तयार नाही. हे दिसले म्हणजे ओळखायचं, ‘थापा’ आला. ‘थापा’ हा या घाटातला एक
महत्त्वाचा टर्निंग पॉईंट.
एक भारदस्त वळण
घेऊन इथे रस्ता वळतो आणि पाचगणीच्या
टेबललँडची आकाशरेषा दिसायला लागते. उतरताना उलटं होतं. गिरकी घेऊन आपण वळण संपवलं
की झटक्यात स्लाईड बदलावी तसा, वाईचा प्रदेश दिसू लागतो. गिरगीर गिरक्या घेणाऱ्या
कोण्या कथ्थक नृत्यांगनेने समेवर यावं आणि सर्व चरही स्थिर व्हावं तसाच अनुभव हा.
एकदा सरत्या श्रावणात याच वळणाच्या, याच समेवर अचानक एक इंद्रधनू माझ्या स्वागताला
थांबलं होतं...पाण्यात निथळणारं ते निऑन-वर्खी तोरण मी कितीतरी वेळ निरखत थबकलो होतो.
सौंदर्याचे असे अकल्पित दर्शन हा या घाटाचा गुण, विशेषतः या वळणाचा.
रात्री अपरात्री
देखील या घाटात बरेचदा प्रवास झालेला. बहुतेकदा काही इमर्जन्सी असते. कोणी बाळंतीण
अडलेली असते. दिवसभर थकलेलं शरीर-मन गोळा करून मी पाचगणीला पोहोचतो. त्या
चिमुकल्या गावात, सोयी सुविधाही चिमुकल्याच. इमर्जन्सीत तर प्राणांतिक अडचणी.
त्यावर प्राणपणाने मात करून, ते पहिले ट्याहां ऐकून, आणखी थकून मी संथ गतीने घाट
उतरायला लागतो आणि त्या कथ्थक वळणावर वाईचे खोरे अवचित झगमगताना दिसते. आकाशात
नक्षत्रांची रेलचेल असते. अक्षय आकाशगंगा जणू निरव खळाळत असते!! गगन आणि धरा असा
भेद मिटून जातो आणि या क्षणासाठी तरी हा प्रवास पुनःपुन्हा घडावा अशी ओढ लागते.
ह्या वळणावरच्या
थाप्याला ‘हॅरीसन फॉली पॉईंट’ असं टुरिस्टी नाव आहे पण आम्हां लोकलांच्या भाषेत, ‘थापा’.
घाटाला सोडून अचानक दरीत घुसलेली ही डोंगराची सोंड. शूटिंग, पतंगबाजी, ओलीसुकी
पार्टी, कोजागिरी यासाठी ब्येस.
थापा ओलांडून
आणखी वर चढलं की येते टुमदार दांडेघर. हे जणू ‘वर’ आणि ‘खाली’ यातील सीमारेषा.
इथून पुढे अचानक हवेत थंडावा जाणवतो, इथूनच रिमझिम पावसाच्या सरीवर सरीं होतात,
इथेच आसपास गाणारी मैना, छोटे भारद्वाजच जणू अशी, युवराज नामक, (crested bunting)
देखणी, डोंगरी पाखरं भेटीला येतात आणि खाली
उतरताना इथूनच पुढे कानाला दडे बसतात. असं काय काय होतं या दांडेघरमध्ये.
मग एक छान वळण लागतं.
बायकांना वश करणारे वळण. या वळणावर, निर्मळ जळ झुळझुळा वहाते आहे आणि जवळच झाडीतून
डोकावणारे साड्यांच्या दुकानाचे होर्डिंग आहे! खूप मोठे. लक्षवेधी. त्यावरील
कर्पुरगौरा बाला आणि त्यांच्या अंगावरील लावण्यसुंदर, अभिरुचीसंपन्न साड्या! बघता
क्षणी पसंत पडावी अशी साडी, ‘बघता क्षणी पसंत पडावी’च्या अंगावर असते. उभयतांची
दाद एकाच वेळी जाते. पण रस्ता वळलेला असतो. गाडी वेगात असते. वळण वळावेच लागते. दृश्य अदृश्य होते. हा या घाटाचा अनवट विभ्रम.
थोडं पुढे गेलं
रानकेळी आणि रानहळदीच्या गचपणानंतर डावीकडे गुलाबांच्या वेलांची जाळी आहे. पांढऱ्याशुभ्र
रानटी गुलाबांचा घमघमाट सुटलेला असतो तिथे. पण पाठोपाठ येतो तो अत्यंत गद्य, मठ्ठ,
अरसिक नाका आणि मख्ख चेहऱ्याने येणाऱ्यापुढे हात पसरणारे टोल-भैरव. पण माझी तक्रार
नाही. कारण मोठ्या टेचात, ‘लोक्लs ऐss’ असं सांगून गाडी पुढे दामटण्याचे सुख, मला
फक्त इथेच.
या नाक्याचा चढ
ओलांडला की पाचगणी. इथे स्वर्गलोकीच्या दारी
आल्याचा भास होतो. वर विस्तीर्ण निळे आभाळ, समोर दरी, खोल खाली कृष्णेचा
निळानिळा, तुडुंब जलाशय, त्यातून उंच उठलेला कमळगडाचा डोंगर, त्याचे म्हातारीच्या बोळक्या तोंडाशी नाते सांगणारे
कडे, त्याही मागे सह्याद्रीच्या विविधरंगी रांगा, भणाण वारा, खाली शेतांचे रंगीबेरंगी
तुकडे, गोधड्या वाळत घातल्यासारखे.
त्यातून वाटा. वाटांच्या संगमावर वाड्यावस्त्यांचे पुंजके. पहाटवेळी सारे धुक्याच्या
दुलाईत लपेटलेलं. दिवस वर येतो आणि धुक्याचा पडदा झिरझिरीत होत जातो. अद्भुत असते
सारे.
पावसाळा असेल तर
इथे वारा, पाऊस, धुके नुसता धिंगाणा घालत असतात. पण इथून सगळ्यात मनोहर दिसतो तो दूरचा
पाऊस. पाऊस जवळूनही साजरा आणि दुरूनही. आपण पाचगणीच्या डोंगरावर उभे असतो आणि दूर दरीत
कुठेतरी पाऊस रिमझिमत असतो. आकाशातून सूर्याचा स्पॉटलाईट पडलेला असतो. जमिनीचा तेवढाच
तुकडा सोनेरी चमकत असतो. शेतातील भाताची हिरवी, पोपटी, सोनेरी, पिवळी आगळी माया
नजर तृप्त करत असते. उन्हाच्या कवडशात पावसाचे थेंब हिऱ्यांसारखे चमकत असतात. पण हे
अप्राप्य ऐश्वर्य पाहण्यातच मजा असते. हे कुबेराचे धन, ते हातात थोडेच मावणार? ते डोळ्यात
आणि चित्तात साठवून घ्यायचे असते.
पण हे
पावसाळ्यात. उन्हाळ्यात, ‘वणवे लावू नका’ हा संदेश मनावर न घेतल्याने घाट भुरभूरु
जळत असतो. डोंगरललाटीच्या या जिभल्या चाटणाऱ्या ज्वाळा रात्री आपलेच काळीज जाळत
जातात. सकाळी पाहावे तो सारा डोंगर काळा ठिक्कर पडलेला. पण उन्हाळ्यातला घाटातला प्रवास म्हणजे दाहक आणि मोहक
दोन्हीही. वाईबाहेर पडतापडता गुलमोहोर, नीलमोहोर आणि बहावे आपापले झुंबरझुबके
नाचवत, फुल-सड्याने पायघड्या घालत असतात. घाटात रणरणते उन, कुठे शुष्क पिवळे गवत
तर कुठे डोंगरच्या डोंगर वणव्याने कातळकाळे झालेले. पण त्याचवेळी पांगारा आणि पळस
लालबुंद फुललेले असतात आणि एखाद्या वळवाने देखील भुईला कोंभ आणि फत्तराला पाझर
फुटतो.
उन्हाळ्यात
टूरीस्तांच्या गाड्या घाटात घोंगावू लागतात. आम्ही लोकल, तेंव्हा सुट्या आणि लोंग
वीकएंडस टाळून आम्ही डोंगर चढणार. पण पूर्वी तर एक पॅटर्नच ठरुन गेला होता.
सुट्टीत कोणी ना कोणी मित्रमंडळी येणार,
त्यांच्या आणि आमच्या मुलांचे तत्काळ मेतकूट जमणार, मग ती मुलं या मुलांना बरोबर
येण्याचा आग्रह करणार, मग ही मुलं त्यांच्या गाडीत बसून त्यांना पाचगणी-महाबळेश्वर
दाखवणार; म्हणजे मुख्यत्वे ‘गेम आर्केड’कुठे आहे, आईस्क्रीम, पिझ्झा, स्ट्रॉबेरी-विथ-क्रीम
वगैरे कुठे खायचं; वगैरे दाखवणार. एकूणच
मित्राच्या पैशावर जीवाचं महाबळेश्वर करणार. आमच्या मुलांना कलेक्ट करायला संध्याकाळी
आम्ही जाणार आणि मित्राच्याच पैशाने जेऊन रात्री परत. रात्री काहीतरी प्राणीमात्र;
कोल्हा, ससा क्वचित बिबट्या असे भेटीला येतात. एकदा तर नुकत्याच कात टाकलेल्या
सापानी माझ्या समोरून रस्ता ओलांडला. पाऱ्याची कांती ल्यालेलं ते जनावर पाऱ्याच्याच वेगाने सळसळत निघून गेलं
आणि एक थंड शिरशीरी सर्वांग व्यापून राहिली.
घाटात मनुष्यप्राणीही
बरेच भेटतात. टुरिस्टांच्या तरी किती तऱ्हा. रविवारी परतीच्या प्रवाशांच्या गाड्या
बेबंद वेगाने घरंगळत उतरतात. यातही एक लक्षात येते. रविवारी सकाळी उठून ब्रेकफास्ट
उरकून वेगाने बाहेर पडतात त्या एमएच 1, 2, 3 किंवा 4 नंबरवाल्या गाड्या. यांना संध्याकाळपर्यंत मुंबई गाठायची असते. टू डू लिस्ट मधील चार दोन काम साधून
सोमवारसाठी सज्ज व्हायचं असतं. दुपारी चार
नंतर मात्र एम एच
12 चा जमाना सुरु. मस्त जेऊन, एक ते चार वामकुक्षी घेऊन, संथपणे चहा
वगैरे पिऊन मग यांच्या स्वाऱ्या निघतात.
ऐटबाज गाड्यांतून जाणारी पण खिडकीतून कचरा बाहेर टाकणारी माणसं आता कमी दिसतात.
शाळेतच एन्व्हायर्नमेंटचे धडे गिरवलेली पिढी आता चक्रधर झाली आहे. मागच्या आणि पुढच्या
पिढीला ती खिडकीतून कचरा बाहेर टाकू देत नाही आणि आता गाड्याही काचबंद असतात
म्हणा.
कधी मोठ्या आवाजात
गाणी वाजवणारे, टपातून डोकं बाहेर काढणारे लहान; आणि लहान झालेले थोर भेटतात तर
कधी भन्नाट आवाजाच्या बुलेट, थरार वेगाने हाणणाऱ्या, लेदरबंद पोशाखातील,
हेल्मेटधारी सुपरमेनचा थवा; ‘भावा; इथे आपलीच हवा!!’ असं बजावत सटासट निसटून
जातो. शाळेच्या ट्रिप बरोबर येणारी बससुद्धा
शाळेतल्या मुलांसारखी लहान होऊन गेलेली. ही बस रोंरावत नाही तर किलबिलत, भेंड्या खेळत
येते. प्रत्येक खिडकीला कुतूहलभरले डोळे फुटलेले असतात. शिवाय कुणालाही बायबाय करणे,
वेडावून दाखवणे अशा लाड्या आणि खोड्या सतत चाललेल्या असतात. नकाशातही टिंब न
मिळालेल्या, कुठल्या गावाहून आलेल्या ह्या बसमध्ये, बघावं तेव्हा चुणचुणीत पिल्लं
हसत खिदळत असतात.
....पण कधी घाटातही
हात सोडून सायकल चालवणारी मुलं भुर्रकन जातात आणि मग ते खिन्नतेचं, उदास वळण
आठवतं.
एका मित्राचा
कोवळा,
सायकलवेड्या वयातला मुलगा, भन्नाट वेगाने घाट उतरत आला आणि एका वळणावर आपला आपणच
अडखळला, पडला, मेंदूत रक्तस्राव झाला आणि गेला. हे लिहायला लागला तेवढाही वेळ
त्याला जायला लागला नसेल. सारेच अकस्मात. त्याचं शरीर अनाघ्रात, पण मेंदू
रक्ताच्या थारोळ्यात; असं पोस्ट मॉर्टेममधे दिसलं. असे अपघातही बरेच...एकदा
चालत्या एस्टीचं दार उघडलं आणि कुणा फिरणाऱ्याच्या जीवावर बेतलं..., घाटात गाडी
दरीत कोसळून इतके जखमी, इतके मृत, त्यांचे अंत्यसंस्कार कृष्णाकाठी घाटावर....,
हेही अधून मधून. शेवटी हाही घाट आणि तोही घाट...!
हा ही दुस्तर
आणि तो ही दुस्तर.
तो अटळ.
हा, डोळसपणे
ओलांडला तर ‘त्याच्या’कडे बघायची दृष्टी आणि समज देणारा. लचकत मुरडत जाणाऱ्या, घाटातल्या वाटेचा
थाट समजावून घेत जायचं ते ह्यासाठीच.
पूर्वप्रसिद्धी
चतुरंग पुरवणी
लोकसत्ता
१८ फेब्रुवारी २०२३