२०३० सालचा दवाखाना
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.
शंभर वर्षापूर्वी दवाखाने कसे होते? इतिहासात आपल्याला ही माहिती नक्की मिळेल. पण शंभर वर्षानंतर दवाखाने कसे असतील? आजार कोणते असतील? डॉक्टर कसे तपासतील?
आज नव्यानव्या तपासण्यांमुळे आजार लवकर लक्षात येत आहेत. नवी नवी औषधे निर्माण केली जात आहेत. पण याच बरोबर नवेनवे आजारही येत आहेत. त्यामुळे शंभर वर्षानंतरचे भविष्य सांगणं अतिशय कठीण आहे.
करोनाची साथ, संगणक आणि इंटरनेटमुळे शाळा कितीतरी बदलली. फक्त सहा महिन्यांत, हा हा म्हणता हा बदल घडला. अशी काही आपली शाळा असेल याची तुम्ही कल्पना तरी केली होतीत का? त्यामुळे शंभर कशाला, अगदी दहा वर्षानंतर काय परिस्थिति असेल, याचा अचूक अंदाज करणे अवघड आहे. पण आपण प्रयत्न करून पाहूया. नुसतेच कल्पनेचे पतंग उडवण्यापेक्षा नीट विचार करून अंदाज बांधूया.
करोनाचंच उदाहरण घेऊ या ना. ताप, थंडी, खोकला असं काही व्हायला लागलं की माणसं दवाखान्यात जातात. रक्त तपासून, सिटी स्कॅन वगैरे काढून निदान केलं जातं आणि मग उपचार सुरू होतात. कधीकधी माणसं, घरीच, बोटाला मशीन लावून स्वतःचं स्वतःच ऑक्सीजन मोजतात. बरेचदा घरीच बरी होतात.
निदान, उपचार, प्रतिबंध अशा आजाराच्या प्रत्येक पायरीवर येत्या दहा वर्षात प्रचंड बदल होऊ शकतात.
आरोग्य-कंकण
मनगटावर बांधलेले घड्याळासारखे यंत्र (आरोग्य-कंकण) तुमच्या शरीरातील अनेक गोष्टी मोजू शकेल. काही औषधांचे रक्तातील प्रमाणही ते सांगू शकेल. मग गरजेप्रमाणे आता अमुक अमुक डोस घ्या असंही ते सांगू शकेल. मग ही माहिती ते यंत्र तुमच्या आणि डॉक्टरांच्या मोबाईलला पाठवेल. मोबाईलचा आणि तुमचा चांगलाच परिचय आहे. काही घोटाळा असला तर मोबाईलमध्ये धोक्याची घंटा वाजेल.
मोबाईल वाचेल तुमचे मन
इतकंच काय तुम्ही मोबाईलमध्ये काय बघताय, काय ‘टाईपताय’ ह्यावर मोबाईल लक्ष ठेवेल. यावरून तो तुमच्या मानसिकतेचा अंदाज बांधेल. (तुमच्या लक्षात आलं का? टाइप+करताय = टाइपताय; असा एक नवीनच शब्द वापरला आहे इथे.) कोणी अगदी निराश असेल, कोणाला अति भीती वाटत असेल; तर तुमचा मोबाईल तुमच्या डॉक्टरांना कळवेल. मग ते तुम्हाला बोलावून उपचार सांगू शकतील.
घरबसल्या तपासण्या
दहा वर्षानंतर तुम्हाला बऱ्याचशा तपासण्या घरबसल्या करता येतील. तुमच्या रक्तातील साखर, हिमोग्लोबीन, कॉलेस्टेरॉल आणि इतर अनेक घटक दंडात बसवलेल्या एका बारीक ‘चिप’द्वारे (चिप म्हणजे अगदी नखाएवढा कॉम्प्युटर) सतत मोजले जातील. त्यातील बदल सतत नोंदवले जातील. ही माहिती सतत डॉक्टरांच्या कॉम्प्युटरकडे आपोआप पाठवली जाईल. यावरून तुम्हाला काही होऊ लागायच्या आतच कॉम्प्युटर धोक्याचा इशारा देईल. मुळात जित्याजागत्या डॉक्टरकडे जायची फारशी वेळच येणार नाही. चिप, मोबाईल, कॉम्प्युटर हे त्रिकुट परस्पर बरेच औषधोपचार करू शकेल.
अशा चिपमुळे कोट्यवधी लोकांची माहिती जमा होईल आणि या डोंगराएवढ्या माहितीतून अनेक नवेनवे शोध लागतील. या माहितीचा उपयोग शिकवणारे, विदाविज्ञान, असे एक नवेच शास्त्र आता उदयाला येत आहे. डॉक्टरांइतकेच याही क्षेत्रातील तज्ञ आवश्यक असतील.
प्रतिमाविज्ञानात विलक्षण झेप
सोनोग्राफीत आईच्या पोटातील बाळ दिसू शकतं, हे तुम्हाला माहीत आहे. सोनोग्राफी, एक्सरे, एमआरआय, सिटी स्कॅन, अशा तपासण्याद्वारे आपल्याला माणसाच्या शरीरात डोकावता येतं. ह्या साऱ्याला प्रतिमाविज्ञान म्हणतात. आज ह्या तपासण्यातून ज्या प्रतिमा निर्माण होतात त्यांचा अर्थ लावायला डॉक्टर असावा लागतो. येत्या दशकात हे काम संपूर्णपणे कॉम्प्युटर करेल. डॉक्टरपेक्षा उत्तम करेल. बिनचूक करेल. झटपट करेल. दिवसरात्र करेल.
पोटाच्या, आतडयाच्या आतल्या त्वचेला काही आजार असतील तर ते डोळ्याला दिसणे महामुश्किल असते. आता एक गोळी मिळते. त्यात सूक्ष्म कॅमेरा असतो. ही गोळी खायची. मग ती अन्न नलिका, जठर, आतडे असा प्रवास करत संडासवाटे बाहेर पडते. या सर्व प्रवासात ती आसपासचे फोटो काढत रहाते. आत काय काय बिघडलं आहे हे आपण त्या फोटोतून शोधून काढू शकतो.
ऑर्डरप्रमाणे अवयव बनवून मिळतील
माणसाला आता कृत्रिम गुडघा, खुबा वगैरे बसवता येतो. मोतीबिंदू झाला तर नवे भिंग बसवता येते. हे अवयव तयार कपड्यासारखे काही ठराविक मापाचे मिळतात. पण ‘त्रिमिती छपाई’च्या नव्या तंत्राने हे अवयव आता नेमक्या मापाचे बनवता येतील. अगदी तंतोतंत माप.
पण किडनी, हृदय, कातडी वगैरे अवयव, एकाचे दुसऱ्याला बसवावे लागतात. नव्या युगात हे अवयव चक्क कारखान्यात बनवता येतील आणि गरजेप्रमाणे माणसात बसवता येतील. बिघडलेले यकृत (Liver), इंन्सुलिन न निर्माण करणारे स्वादुपिंड (Pancreas), झिजून नष्ट झालेली सांध्यातील कुर्चा (Cartilage) सरळ ऑर्डरप्रमाणे बनवून मिळतील.
प्रतिकारशक्तीवर सखोल संशोधन
आपल्या शरीरात जंतू शिरले की ही प्रतिकारशक्ती काम करू लागते. जंतूंना मारून टाकते. बाहेरून जसे जंतू आपल्या शरीरावर हल्ला करतात तशाच आपल्या शरीरातील काही पेशी रोज नियम मोडून वेड्यावाकड्या वाढायला लागतात. प्रतिकारशक्ती, अशा पेशी नष्ट करते. कधीकधी हे काम नीट होत नाही. मग अशा वेड्यावाकड्या, बेशिस्त पेशी सतत वाढत रहातात. त्यांची गाठ बनते. आपण या आजाराला कॅन्सर (कर्करोग) म्हणतो. या क्षेत्रातील संशोधनामुळे प्रतिकारशक्तीची शक्ती वाढेल. कॅन्सरचे उपचार पूर्णपणे बदलून जातील. बरेचसे कॅन्सर टाळता येतील. काही बरे करता येतील.
प्रतिकारशक्ती ही दुधारी तलवार आहे. मांजरी जशी कधी कधी आपलीच पिल्ले खाते तशी प्रतिकारशक्ती कधी कधी आपल्याच चांगल्या पेशीही नष्ट करते. प्रतिकारशक्तीबद्दल आपली समज वाढली की ती कमी-जास्त करता येईल. दमा, संधिवात असे अनेक आजार प्रतिकारशक्ती नियंत्रित करून बरे करता येतील.
जनुकीय औषधोपचार
आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीत तीच गुणसुत्रांची लड असते पण प्रत्येक पेशी काही विशिष्ठ काम करत असते. याचं कारण प्रत्येक पेशीत आवश्यक तेवढीच गुणसुत्रे ‘चालू’ केली जातात. कोणती गुणसुत्रे चालू आहेत, कोणती बंद आहेत हे लवकरच समजू शकेल. पेशींची वागणूक आपल्याला अगदी स्पष्ट कळेल. गरजेप्रमाणे गुणसुत्रे ‘चालू’- ‘बंद’ करणारी किल्ली आपण बनवलेली असेल. त्यामुळे गुणसूत्रात काही दोष असेल तर तोही दुरुस्त करता येईल. याला म्हणतात जीन एडिटिंग (Gene editing). महाराष्ट्रात, विदर्भात सिकल सेल अॅनिमिया नावाचा आजार आढळतो. यात पेशंटच्या शरीरातील रक्त कमीच रहाते. सिकल सेल सारखे आजार मग चक्क बरे करता येतील.
मेंदूच्या अंतरंगात डोकावता येईल
मेंदूचे कार्य आपल्याला बरेचसे अज्ञात आहे. येत्या दशकात प्रतिमाविज्ञानाच्या सहाय्याने आपल्याला मेंदूचे कार्य ‘पहाता’ येईल. म्हणजे आज जसे आपल्याला सोनोग्राफीत धपापणारे हृदय दिसते तसे उद्या चिंताग्रस्त, आनंदी अथवा मत्सरी मेंदू दिसेल. मेंदूचा कोणता भाग निष्क्रिय आहे ते दिसेल. भ्रमिष्टपणा, पक्षाघात वगैरे आजारांचे अचूक उपचार शक्य होतील.
ड्रोन पोहोचवतील औषधे
युद्धभूमीवर, भूकंप, वादळ वगैरे आपत्ती आल्यावर झटपट औषधोपचार न मिळाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागतात. लग्नात कॅमेरे लावून उंचावरून शूटिंग करायला वापरली जाणारी ड्रोन विमाने अशा दुर्गम ठिकाणी औषधे नेऊन पोहोचवतील, रक्त नेऊन पोहोचवतील. तिथल्या पेशंटचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी मोठ्या लॅबोरेटरीला पोहोचवतील. ‘कठीण समय येता ड्रोन कामास येतो’; अशी नवी कविताही कोणी नवा वामनपंडित लिहील.
नव्या लसी
येत्या दहा वर्षात काही लसीही येतील. एच आय व्ही एड्स वर लस् येईल. फ्ल्यू वर येईल. आणि हो, येत्या वर्षभरात करोनावर लसही निघेल... किंवा करोना खूप कमी होईल. मग शाळा पुन्हा सुरू होईल, पुन्हा मामाच्या गावाला जाता येईल, सहली, स्नेहसंमेलने, वक्तृत्व स्पर्धा पुन्हा सुरू होतील. ही माहिती वाचून एखाद्या स्पर्धेत तुमच्या भारी भाषणाला बक्षीससुद्धा मिळेल!
पूर्व प्रसिद्धी 'किशोर' दिवाळी २०२०