टेस्ट ट्यूब बेबीचा निर्णय घेताना...
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
आधी या संदर्भातले काही शब्द स्पष्ट करतो. आय.व्ही.एफ. म्हणजे इन व्हिट्रो फर्टीलायझेशन. म्हणजे शरीराबाहेर फलन घडवून, तयार गर्भ, गर्भपिशवीत सोडायचा असे उपचार. असाच एक शब्द आहे, ए.आर.टी.. ए.आर.टी. म्हणजे असिस्टेड रीप्रॉडक्टीव्ह टेक्नीक्स. हा जास्त व्यापक अर्थाने वापरला जातो. पण उगीच शब्दच्छल कशाला, इथे बोली भाषेतला टेस्ट ट्यूब बेबी हा शब्द पुरेसा आहे आणि पुरेसा बोलका आहे.
गंमत म्हणजे, जरी अनेक सेंटरच्या लोगोमध्ये टेस्ट ट्यूबमधून रांगत येणारं बाळ दाखवलं असलं तरी टेस्टट्यूब बेबीच्या प्रक्रियेत प्रत्यक्षात टेस्टट्यूब कुठेच वापरली जात नाही! टेस्ट ट्यूब इथे प्रतिकमात्र आहे, विज्ञान, तंत्रज्ञान, प्रयोगशाळा या साऱ्याचं.
टेस्ट ट्यूब बेबी करा असं सांगितलं की पेशंटच्या मनात पहिला विचार येतो, ‘बापरे, टेस्ट ट्यूब बेबी करून पहाण्यापेक्षा हा डॉक्टरच बदलून पाहू!’ बरेचदा यामागील अवाढव्य खर्च, त्यातील अनिश्चितता भंडावत असते. टेस्ट ट्यूब बेबी करणे अवघड खरंच. डॉक्टर लोकांत एक म्हण आहे, ‘इट इस मोर ऑफ मॅजिक दॅन लॉजिक’.
डॉक्टर सारखीच पेशंटलाही यासाठी प्रचंड आर्थिक, शारीरिक आणि मानसिक गुंतवणूक करावी लागते. खूप काही सोसावं लागतं. इतकं करून सारं काही गोड गोड घडेल असं नाही. तेंव्हा अपयश, हताशा, नैराश्य झेलण्याची ताकद असावी लागते. कुटुंबियांची भरभक्कम साथ असावी लागते. हे सगळं जुळवण्यास वेळ लागतो. या जुळवाजुळवीत पेशंटकडून घडणारी घोडचूक म्हणजे निर्णय उशिरा घेणे. जितकं वय वाढेल तितकं यश मिळण्याची शक्यता कमी कमी होत जाते. पस्तिशीच्या पुढे तर गर्भसंभवाची शक्यता निम्यानी घटते.
प्रत्येक स्त्रीत गर्भावस्थेत असतानाच काही कोटी स्त्रीबीजे तयार होतात आणि नंतर लगेचच त्यातील काही वाळायला सुरवात होते. ही क्रिया आयुष्यभर चालू रहाते. त्या मुलीचा जन्म होतो, ती लहानाची मोठी होते, तिला पाळी येते. तिच्या पुनरुत्पादक वयापावेतो उरलेल्या ३००,००० बिजांपैकी सुमारे ४०० बीजे प्रत्यक्षात वापरण्यायोग्य अशी पिकतात. यातील काहींचे फलन होते आणि मुले होतात. बाकीची वाळत रहातात. ठराविक वयानंतर बीजे संपतात आणि पाळी जाते.
या वाळण्यात आणि वाढण्यातही काही संगती आहे. उत्तमोत्तम बीजे असतात ती विशी तिशीच्या दरम्यान वाढतात. नंतर उरतो तो कमअस्सल माल. त्यामुळे उशिरा दिवस राहीले, मग ते नैसर्गिकरित्या असोत व टेस्ट ट्यूब बेबी तंत्राने, त्यात गोच्या होण्याची शक्यता बरीच असते. या उरल्यासुरल्या बिजांमध्ये सदोष गुणसूत्रे फार. इथे विभाजन होताना समसमान वाटा होत नाही आणि असमान वाटणी सुदृढ बीजास धार्जिणी नाही. म्हणून अशी बीजे जनुकीयदोष बाळगून असतात. त्यामुळे मुळात रहायलाच वेळ लागणे, गर्भपात होणे, सव्यंग संतती होणे असले प्रकार फार. म्हणूनच वेळेत निर्णय महत्वाचा. पण आजकाल अनेक कारणाने लग्नच उशिरा होतात, पुढे जोडपी जननोत्सुक व्हायला आणखी वेळ घेतात आणि मग ह्या स्टेशनवर गाडी पोहोचायला वेळ लागतोच.
अशावेळी बीजांचा शिल्लक स्टॉक किती आहे हे सांगणारी, रक्तातील ए.एम.एच. नामे करून एक तपासणी केली जाते. मासिक पाळीच्या चक्रानुसार या ए.एम.एच.मध्ये बदल होत नाहीत त्यामुळे महिन्याच्या कोणत्याही दिवशी ही तपासणी करता येते. अगदी गर्भनिरोधक गोळ्या चालू असतील तरीही करता येते. अर्थात ही तपासणी म्हणजे मूल होईल की नाही हे सांगणारी भविष्यवाणी नव्हे. उरलेल्या बीजांची प्रत अथवा जनुकीय पत वगैरे यातून कळत नाही. मात्र उपचाराला कितपत प्रतिसाद मिळेल, किती घाई करायला हवी, हे सांगणारी एक दिशादर्शक तपासणी आहे.
याउलट पुरुषांच्या बीजसंख्येत अथवा गुणवत्तेत पंचेचाळीशीनंतर अगदी जेमतेम फरक पडतो.
टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काही जादू नाही. दर वेळी यश मिळेलच असे नाही. यशाचे प्रमाण २५%. अगदी खूप वेळा प्रयत्न केला तर ५०%. ही आकडेवारी बऱ्याच जणांना सीमेवरून परत पाठवते. हा जुगार नकोच अशीच त्यांची मानसिकता होते. पण २५ ते ५०%, ‘इतके यश तुला रग्गड’, हेच खरे. एरवी धडधाकट जनतेतही मुले होण्याचे प्रमाण आपल्याला वाटते त्यापेक्षा बरेच कमी असते. बीजोत्पत्ती होण्याच्या सुमारास जोडप्याचा एकदा सबंध आला तर दिवस रहाण्याची शक्यता जेमतेम ८% असते. पण एरवी काही फरक पडत नाही, कारण दरवेळी आपल्याला त्यात लाख दीडलाख रुपये घालावे लागत नाहीत! टेस्टट्यूबवाली जनता तर ‘नॉर्मल’ नसतेच. म्हणून तर ते टेस्ट ट्यूब बेबीसेंटर पर्यंत पोहोचलेले असतात. ह्यांच्यात अर्थातच अशी शक्यता अगदीच अल्पस्वल्प. ज्यांना टेस्ट ट्यूब बेबी हा पर्याय सुचवला जातो, त्यांना उपचार न घेता दिवस रहाण्याची शक्यता जेमतेम १ ते २ %च असते. कित्येकांना ०% एवढी असते. म्हणजे जमलं तर टेस्ट ट्यूबबेबीच्या मार्गानी अन्यथा नाहीच! ह्यापेक्षा टेस्ट ट्यूब बेबी करून २५% ते ५०% यशाची शक्यता म्हणजे त्यांच्या दृष्टीने लय भारी! अर्थात ही सगळी आकडेवारी झाली. अमुक एका जोडप्याला पुढे काय रिझल्ट येईल हे यात सांगता येत नाही. त्या त्या जोडप्यासाठी मूल झालं तर ते १००% यश असतं आणि नाही झालं तर ते १००% अपयश. तेंव्हा यशापयशाची आणि त्यातील आपल्याला लागू असलेल्या विशेष, भल्याबुऱ्या शक्यतांची, घटकांची, पर्यायांची, सविस्तर चर्चा करणे उत्तम. उगाच फार कल्पनेच्या भराऱ्या मारू नयेत. डोकं खांद्यावर आणि पाय जमिनीवर ठेऊन विचार करावा. कुणी यशाची १००% खात्री देत असेल, तर त्याचे/तिचे औषध मुळीच घेऊ नये कारण अशी हमी देणारा/री बनेल आहे हे स्पष्टच आहे.
अपयशाची चिंता आधीच केलेली बरी. असं झालंच तर मुळात टेस्ट ट्यूब बेबीचा आग्रह धरणाऱ्या जोडीदाराला किंवा डॉक्टरला दोष देण्यात काही अर्थ नाही. निराशा, वैताग, स्वतःला बोल लावणे वगैरे भावनांशी दोन हात करून पुन्हा नव्या उमेदीने जगायला शिकणं, प्रसंगी अपत्यहीन रहावं लागेल, याचाही मनोमन विचार असणं गरजेचं आहे. ह्या प्रश्नांची उत्तर देणारा कोणताही फॉर्म्युला नाही. उपलब्ध पैसा, जोडीदाराचं पाठबळ आणि तुमचा मूल्यविवेक यावर उत्तर ठरणार.
मुलासाठी औषधोपचार घेणाऱ्यांना तीव्र मानसिक आणि भावनिक चढउतार पार करावे लागतात. कधी कधी नात्यातला ओलावा संपतो. समागमही निव्वळ एक कर्मकांड म्हणून उरतो; त्यात ना उत्साह उरतो ना उत्स्फूर्तता. योगापासून संभोगापर्यंत सारं काही, अपत्यप्राप्ती, या एकाच आसाभोवती भोवरत रहातं. अमुक दिवशी गोळ्या घ्या, तमुक दिवशी ‘जवळ या’, असल्या गद्य, न्यायालयीन फर्मानांनी दुसरं काय होणार? टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट आणि त्यातील अपयश म्हणजे तर या साऱ्या तणावांची परिसीमा. या साऱ्यातून बाहेर पडायचं तर थोडा शांतपणे विचार करायला शिकायला हवं. आपण शक्य ते उत्तम उपचार घेतले आहेत, प्रामाणिकपणे सर्व पथ्यपाणी पाळले आहे, हे जर तटस्थपणे विचार करता मान्य असेल, तर भविष्याचा विचार करायची उमेद वाढते. तुमच्या कल्पनेतला आदर्श भविष्यकाळ उजळणार नसेल कदाचित, पण जो काही असेल तो काही काळाकुट्टच असेल असंही नाही. काही अनवट सुखं, त्यातही लपलेली असतीलच की.
स्वप्नातलं मूल सत्यात उतरलं नाही याचं दु:ख असतंच, अगदी प्रत्यक्षातलं मूल गेल्यावर असतं तितकंच तीव्र असतं. या दु:खालाही न्याय द्यायला हवा. खुलेआम शोक करायला हवा. मग कसं हलकं हलकं वाटतं. माझ्या एका पेशंटनी अंगणात एक झाड लावलं, एकीनी ह्या न झालेल्या बाळाच्या स्मृत्यर्थ छान पेंटिंग केलं. ह्या साऱ्याची मदत झाली त्यांना.
....आणि एकदा, ‘हा मार्ग बंद!’, असं मनोमन ठरल्यावर, सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते आपल्या जोडीदाराची सूर जुळवून ठेवणं. तसंही आयुष्यातल्या एका अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतून तुम्ही पार झाला आहात. यामुळेच रेशीमबंध कदाचित अधिक गहिरे झाले असतील, किंवा कदाचित नात्यांनी दुसरं टोकही गाठलं असेल, अगदी विशवीशीत झालं असेल सारं. तेंव्हा या आघाडीवर लागेल ती डागडुजी करायला हवी. जेंव्हा आता पुरे असं ठरतं, तेंव्हा अचानक स्वतःसाठी खूप वेळ मिळायला लागतो. दारू सोडलेल्या दारुड्यासारखं, ‘वेळेचं करायचं काय?’ असा प्रश्न पडू शकतो. एका अग्नीदिव्यातून तुम्ही तावून सुलाखून निघालेले असता. स्वतःला अधिक ओळखू लागलेले असता. पुढे काय या प्रश्नाचं उत्तर तुमचं तुम्हाला गवसतं.