गप्पातली माणसं
डॉ.शंतनू अभ्यंकर, वाई.
मंगल कार्यालयातली, आतली
हवाबंद खोली असते. पंखा कुरकुरत काम केल्या सारखं करत असतो. घामेजलेली दुपार असते,
पंगती नुकत्याच उठलेल्या असतात. सतरंजीवर
लोड, तक्के, उशा, गादया, पांघरूणं, अस्ताव्यस्त पसरलेली असतात. अक्षता, गजऱ्यातून
ओघळलेली फुलं, पेढ्याचे कागद, पानाची देठं, लाडू-चिवड्याचा चुरा अशी कशाकशाची वर पखरण असते. त्यातच मंडळी; नाना, नानी, आत्या, मामा, माम्या, मावश्या, अण्णा,
अप्पा, तात्या, दादा, अंग मुडपून, भींतीला पाठ टेकून गिचमिडाटात बसलेले असतात. पोरं,
सोरं, तान्ही, निम्मी सतरंजीवर आणि निम्मी आयांच्या मांडीवर सांडलेली असतात....आणि
गप्पातली माणसं हसत खिदळत भेटायला येतात.
...किंवा दिवाळीची सुट्टी
संपतासंपतानाची थंड, गारठलेली रात्र असते, माजघरात मात्र उबदार असतं. लाईट गेलेले
आणि सेल संपतील म्हणून बॅटऱ्या बंद. एकच कंदील. स्वयंपाकघरातील झाकपाक झाली तो की माजघरात
येतो. पेंगुळलेले चेहरे किंचित उजळतात, भींतीवर मोठया मोठया सावल्या नाचतात....आणि
गप्पातली माणसं सभोती फेर धरतात जणू.
...किंवा रात्रीच पोहोचायचे
पाहुणे मजल दरमजल करत कसेबसे पहाटे डेरेदाखल होतात. साखरझोपेतून उठून, चहाचं आधण
ठेवलं जातं. पुन्हा आता झोप लागणार नाही, हे लक्षात घेऊन मंडळी तिथेच बैठक
मारतात...आणि गप्पातली माणसं आसपास वावरू लागतात!
ह्जारो वेळा भेटल्येत ही
गप्पातली माणसं, सगळा गोतावळा जमला की ही असतातच आसपास. आपण फक्त स्मरण करायचं.
स्मरणे मात्रेमान कामना पूर्ती. कोणी प्लॅन्चेट करावं आणि एका मागोमाग एक आत्मे,
आज्ञाधारकपणे हजर व्हावेत तशी ही माणसं. आठवणीसरशी हजर होतात आणि आपला आपला प्रवेश
संपवून मुकाट निघून जातात. सर्वपित्री अमावस्येला पितर बितर जसे भेटायला येतात तशी
ही गप्पातली माणसं, आमचा गोतावळा जमला की हजर. श्रावणातल्या कहाण्यांसारखी,
भोंडल्याच्या गाण्यांसारखी, ही आपली सदासतेज. कितीही वेळा यांचे किस्से ऐकले तरी
दरवेळी तितकीच मजा येते. यातली काही तर मी कधी बघितलेली सुद्धा नाहीत.
पिढ्यानपिढ्या दागिने जसे दिले जातात, तसे या माणसांचे किस्से ही आमची फॅमिली दौलत
आहे. दूरच्या काकाला, लांबच्या जावयाला, नव्या सुनेला आमच्या कबिल्यात प्रवेश हवा
असेल तर ह्यांच्याशी दोस्ती करावीच लागते. यांच्या लकबी, सवयी, आणि त्या वरूनचे
खास शब्द, वाक्प्रचार हे माहीत व्हावेच लागतात. नाही तर ती व्यक्ती नुसती नावाला
घरची, मनोमन मात्र दारची.
या गप्पात हमखास एक वंदी
म्हणून येते. बहुतेकदा सुरवातीचा प्रवेश हिचा. बुद्धिमत्ता यथातथा, दिसणंही यथातथाच,
तेव्हा लग्न होई पर्यंत दुसरं काय करणार म्हणून वेगवेगळे क्लास. पण हिनी म्हणे कुठलाही क्लास लावला की तो मास्तर
मरायचा! काय योगायोग असेल तो असो. वंदीनी शिवण कामाचा क्लास लावला, तो मास्तर गचकला. तिनी तबल्याला हात घातला, तबल्याचे
बुवा लगबगीनी देवाघरी गेले. अकौंटन्सीचा क्लास लावला, तर अकौंटन्सीचे सर दुसऱ्याच दिवशी गतप्राण झाले.
एवढे नरबळी झाल्यावर पुन्हा वंदीनी क्लास लावायचा म्हटलं की सगळे मनातल्या मनात चरकायचे.
स्पष्ट बोलायची कुणाची हिम्मत नव्हती. कारण वंदीच्या भल्या दांडग्या देहाचा ती
शस्त्र म्हणून वापर करीत असे. तिनी धक्का जरी दिला तरी माणूस हेलपाटत जाईल असा देहसंभार
होता तिचा. वंदी, तिचा आकार आणि मास्तर मरण्याचा अतर्क्य योगायोग हे सगळंच टिंगलीचा
विषय होते. वय वाढलं तशी ही वंदी करुणेचा
विषय झाली. तिला साजेसं स्थळ तिला मिळेना. वसंतराव म्हणून एक मिळाला, तो नवरा
दारुड्या निघाला. हिला पुरेसा त्रास देऊन, संपूर्ण कफल्लक करूनच तो मेला. ना मूल,
ना बाळ, ना नवरा; भक्कम बांधा, मध्यम वय आणि सुमार शिक्षणाच्या जोरावर ही जमेल
त्या नोकऱ्या करत गेली. आई बापामागं भाऊ जेमतेम मदत करायचे. पण कितीही अडचणी आल्या
तरी हीचा सतत दंगा, हसणं, मोठयामोठयानं बोलणं चालूच.
कुटुंबात लांबचं जवळचं कुठलंही
कार्य असो, वंदी हजर. नुसतीच हजर नाही तर पदर खोचून हजर. नवऱ्याच्या मारझोडीपासून, उपास, उपेक्षा आणि
अवहेलनेपासून, तेवढीच सुटका! चार दिवस रहाणार, (नुसतीच) रोटी खाणार आणि
(त्यातल्यात्यात) लठ्ठ होऊन घरी जाणार. कार्यघरी
आल्यागेल्याचं आपुलकीनी करणार. घरातल्या नोकर माणसाच्या खांद्याला खांदा लावून काम
करणार, वर त्यांच्यावर लक्ष ठेवणार. कुणाचा डाग, कुणाचे पैसे, कुणाचं पोर सगळं सगळं
सांभाळणार. दमडीची अपेक्षा नाही. गप्पात
पुढे, भेंड्यात पुढे पुढे, नाव घेण्यात तर सगळ्यात पुढे. एकदा भर समारंभात हिनी
नाव घेतलं, ‘कपाळावर रेखला कुंकवाचा टिळा; वसंतरावांनी मारलं तरी लागत नाही मला!’
हे ऐकून बाकीच्यांना हुंदका फुटला पण वंदी मात्र फिदीफिदी हसत होती. ती मनमोकळी
होती का खुळी? पुढे पुढे कुणी तिच्या मनमोकळ्या स्वभावाबद्दल बोललं तर ती तितक्याच
मोकळेपणी सांगायची, ‘कसलं मन आणि कसलं मोकळं, एवढा मोठा देह आहे, बाकी ना पत ना
प्रतिष्ठा, ना पैसा ना अडका. चेष्टा करतात म्हणून कुढत बसले तर आत्ता विचारतात ते
ही कोणी विचारणार नाहीत, त्यापेक्षा आपणच
आपली थट्टा केलेली चांगली.’ एवढं बोलून ती जे हसायची ते अगदी विचित्र असायचं. मरणही
मोठं करूण आलं तिला. चाळीच्या चौथ्या माळ्यावरच्या कोपऱ्यातल्या खोलीत वंदी गेली आणि ते
कळायला दोन दिवस लागले. ताठर झालेला तिचा महादेह जिन्यात वळेनाच मुळी. बरीच खटपट
करून, त्या देहाची विटंबना झाल्यावर, सतरंजीत गुंडाळून तो खाली आणला म्हणे.
अण्णा बहीरट हा आणखी एक. हा
ठार बहिरा. रिटायरमेंट नंतर वेळ ह्याला खायला उठायचा, आणि हा घरच्यांना खायला उठायचा.
अण्णांना वेळ असल्यामुळे त्यांच्या घरची रद्दी सुद्धा तारीखवार लावलेली असे. म्हणजे
आपण सोमवारचा पेपर हवा, असं सांगत शुक्रवारी त्यांच्या घरी गेलो, की ते रद्दीवर
हात ठेऊन, डोळे मिटून, ‘...गुरुवार, बुधवार, मंगळवार...’, अशा मोजून तीन घडया वर
उचलत आणि अलगदपणे त्या खालची सोमवारची घडी काढून मोठ्या फुशारकीनं आमच्या हातावर
ठेवत. वर, ‘हे असलं काही करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका, ये तुम्हारे बस की बात
नही है’ असा मिश्कील भाव चेहऱ्यावर.
रोज ह्याच्यासाठी करमणूक
तरी काय शोधायची हा एक मोठाच प्रश्न होता. ऐकूच येत नसल्यामुळे सिनेमा, नाटक,
टीव्ही बंद. गप्पा, खेळ वगैरेही बंद. तेव्हा कुठलंही प्रदर्शन हा अण्णांचा खास
टाईमपास. चित्र, शिल्प, फोटो, पुस्तकं, भरतकाम, कपडे, फर्निचर, गुलाब, मोडी कागदपत्रं
असं काहीही असलं तरी अण्णा हजर. वेळे आधी हजर ते अगदी हॉलला कुलूप घाले पर्यंत
अण्णाचं निरीक्षण चालूच. एकदा गावाबाहेर,
खूप खूप लांबच्या कुठल्याशा वस्तीत, नवीन स्कीम मध्ये, ‘सॅम्पल फ्लॅट तयार आहे’,
हे वाचून अण्णांचा आनंद गगनात मावेना. आता खूप वेळ जाणार. घरच्यांचा आनंद तर
ब्रम्हांडात मावेना. शिवाय तिथे जायला बस कोणती वगैरे तेही दिलं होतं. बसनी जायचं म्हणजे
आणखी वेळ जाणार. अण्णा आणखी खूष. घरचे डबल खूष. पण यावर कडी म्हणजे, तो सॅम्पल
फ्लॅट बघायला उपलब्ध होणार, त्याच्या आदल्या दिवशीच दोन बसेस बदलून अण्णानी साईट
गाठली. तेव्हा तिथे एक काळं कुत्रं आणि दोन गोरे रखवालदार या शिवाय कुणीही नव्हतं.
दुसऱ्या दिवशी आपण कसे कसे येणार, हे पहायला म्हणून, अण्णा आदल्या दिवशीच एक
प्रदक्षणा घालून आला होता! तेवढाच वेळ गेला.
अण्णाशी संवाद म्हणजे
बोलणाऱ्याचीच सत्वपरीक्षा. हा कानाला मशीन लावायचा, त्यामुळे बोलणाऱ्याला वाटायचं
हा आपलं बोलणं ऐकतोय. पण तो ते मशीन बंद ठेवायचा. मग अण्णा मधूनच स्वतः बोलायला
लागायचा. ते अर्थातच सुसंगत नसायचं. पण बोलण्याची अण्णाला भारी हौस. ह्याचा
मोनोलॉग मुळी संपायचाच नाही. सिंधू म्हणून
ह्याची बहीण होती. ती तेवढं त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकायची, मधूनच माना बिना डोलवायची.
अण्णाची बडबड सहन करते म्हणून सिंधूला कारुण्यसिंधू म्हणायचे. एके दिवशी ह्या अण्णाला
असा काही चेव चढला की ही कारुण्यसिंधू ताई सुद्धा वैतागली. त्याला सांगून काहीच
उपयोग नाही, तेव्हा हिनी पाटीवर, ‘अण्णा, वायफळ बडबड करू नये’, असं लिहून पाटी अण्णासमोर
धरली. पण याचा अण्णावर ढिम्म परिणाम झाला नाही. अण्णानी पाटी वाचूनही आपली टकळी
चालूच ठेवली, ‘वायफळ नको तर काय? जायफळ बडबड करू? रामफळ बडबड करू? सीताफळ बडबड
करू?...’
सीताफळावरून गप्पांची गाडी
मग पाटील गुरुजींकडे वळते. पाटील गुरुजी म्हणून एक होते म्हणे. अति श्रीमंत पण
महाकंजूस. ह्या कुबेराच्या सावकाराकडे जेवायला एका वेळी एकच पदार्थ असायचा. म्हणजे
आज शेतातनं सीताफळं आली तर दिवसभर सीताफळ हेच अन्न. मक्याची कणसं आली की निव्वळ
कणसं, शेंगा आल्या की शेंगा, हरबरा निघाला की हरबरे. ह्यांची बायको मग रानोळा वाटायला
म्हणून आळीत घरोघरी जायची आणि या रानोळ्या बदल्यात स्वतः झकास जेवून घ्यायची.
गुल्लू नावाचा त्यांचा गडी सावकार गावाला गेले की पाच भाज्या, पाच चटण्या, पाच
कोशिंबिरी, असा साग्रसंगीत स्वयंपाक करायचा. म्हणायचा ‘आज झूम’. अजूनही कोणी संधी
साधून काही जगावेगळं केलं की आम्ही म्हणतो, ‘आज झूम!’
ह्या गुल्लुची मुलगी होती.
तीच तोंड विचित्र होत जरा, त्यामुळे की काय, पण ती रात्री गगनभेदी घोरायची. कुशीवर
झोपली की घोरणं बंद, पाठीवर झोपली की घोरणं सुरु, असा प्रकार. गुल्लू तिच्या
पाठीला लाकडी बाहुली बांधायचा. त्यामुळे तिला कुशीवरच झोपावं लागायचं आणि इतर
सगळ्यांच्या झोपा व्हायच्या.
भास्कर आजोबा तर अगदी
गमतीशीरच होते. हेही घोरण्यासाठी प्रसिद्ध. त्यांची नात त्यांना सांगायची, ‘आजोबा,
तुम्ही आजोबा नाही वाघोबा आहे.’ मोठया निगुतीनी त्यांनी गुलाबाची बाग जोपासली
होती. भास्कररावांची गुलाबाची बाग अख्या गावात प्रसिद्ध होती. तऱ्हेतऱ्हेचे गुलाब.
रंग, गंध, पोत, आकार याचं केवढं तरी वैविध्य.
कधीच न उमलणारे गुलाब, निव्वळ रात्रीच उमलणारे गुलाब, बिनकाट्याचे गुलाब,
काळेकुट्ट गुलाब आणि पांढरेशुभ्र मुसमुसते गुलाब. वेली गुलाब, कुंडीतले गुलाब; काश्मीर,
युरोप, इराण, कुठून कुठून हौसेनं आणलेले. मायेने जोपासलेले. एकेक हे एवढाल्लं,
गेंडेदार, तरतरीत, हसरं फूल. पण रोज
सक्काळी सक्काळी कोणीतरी यायचं आणि सगळी फुलं चोरायचं. फुल चोराघरी आणि काटे
भास्कररावांच्या पदरी. ज्या कलिकेवर आदल्या दिवशी भास्करराव आशिक, तेच फूल दुसऱ्या
दिवशी चोरलेलं.
यावर उपाय म्हणून कुत्रं
आणलं, तर त्यानी पहिल्याच दिवशी बागेत असा काही धुमाकूळ घातला की काही विचारू नका.
माती उकरली, रोप उपटली, फुलं खाल्ली, ठायी ठायी शी-शू करून ठेवली. शी-शू हे उत्तम
खत असल्यामुळे ते भास्कररावांना पसंत होतं. पण त्याचा इतर उच्छाद बघता, भास्करराव
ते कुत्रं तत्काळ परत करून आले. वर कुत्र्याच्या मालकांनी कुत्रं परत घेतलं पण
पैसे मात्र निम्मेच परत केले हे दुखः ही होतंच. मग व्हरांड्यातला दिवा चालू ठेवून
झाला, गेटला कुलूप लावून झालं पण चोर कशाकशाला बधेना. गेट वाजलं की चोर पकडायचा
असं ठरवून एके रात्री भास्करराव व्हरांड्यात झोपले. पण थंडगार पहाटवाऱ्यात त्यांना
अशी काही गाढ झोप लागली की व्हरांड्याच्या जाळीतून दुधाच्या थंडगार पिशव्या अंगावर
पडल्या तेव्हाच त्यांना जाग आली. तो पर्यंत फुलं गायब.
एके दिवशी भास्करराव पहाटे
उठून काळं कापड पांघरून चक्क गुलाबाच्या ताटव्यातच पहूडले. थोड्याच वेळात
अपेक्षेप्रमाणे तो चोर आला. आधी त्यानी
गेटला पिशवी लटकवली आणि मग गेटवर चढून त्यानी बागेत उडी टाकली. दबकी पावलं टाकत,
इकडचा तिकडचा अंदाज घेत, त्यानी गुलाबाच्या फुलाला हात घालताच भास्करराव उठून बसले
आणि म्हणाले, ‘या, या, या! आपलीच वाट
पहातो आहे. घ्या न घ्या!! फुलं घ्या!!!’
त्या चोराला ऐन थंडीत घाम फुटला, पायजमाच ओला झाला त्याचा. गेटवरून उडी टाकता
टाकता गेटवरच्या बाणाने नेमका नको त्या जागेचा वेध घेतलाय हे त्याच्या कळवळण्यावरून
स्पष्ट कळत होत. त्या दिवशी फुललेल्या फुलांच्या गालावर कायमची मुस्कुराहट कोरली
गेली. ती स्मितहास्ये कधी कोमेजलीच नाहीत.
ब्रिगेडियर राणे होते एक.
अख्या पलटणीचा यांच्यावर गाढा विश्वास पण पत्नीचा अजिबात नाही. रिटायर झाल्यावर
गाडी घेऊन पुण्यात बंगला बांधून ऐषोरामात रहात होते. पण ह्या जीवाची एकच व्यथा
होती. गाडी चालवताना शेजारी बसून बायको सतत सूचना देत असे. आपल्या ब्रिगेडियर
नवऱ्याला गाडी अजिबात चालवता येत नाही याची बाईंना खात्रीच होती. अर्थात
ब्रिगेडियरबाईंना गाडी अजिबातच चालवता येत नव्हती. पण हे महत्वाचं नाही. नवऱ्याच्या ह्या अपंगत्वावर, सतत हॉर्न वाजवणे हा
बाईंचा नामी उपाय होता. गाडी पुढे जाताना, वळताना, मागे घेताना, एकुणात गाडी स्थिर
नसताना सतत, ‘हॉर्न वाजवा’ हे एकच टुमणं बाई लावून धरायच्या. मग ब्रिगेडियर सायबांनीही
एक नामी शक्कल काढली. जुन्या बाजारातून त्यांनी चक्क एक रिक्षाचा पोंगा विकत आणला,
आणि तो बाईंच्या सीटपुढे बसवून घेतला. केव्हाही हॉर्न-ध्वनीची सय आली, की बाईंनी
आपला-आपला पोंगा मनसोक्तपणे, निःसंकोचपणे, हवा तेवढा वेळ, हवा तितक्या जोरात
वाजवावा, अशी ही आयडिया
होती. बाईंनी नेमकं काय वाजवलं हे कळलं नाही!
खो खो हसवत नलूआत्याचा निबंधही
येतो गप्पात भेटायला. ‘माझी आई’ या विषयावर तिनी आपला तिच्या अनुभवानुसार, कुवतीनुसार
आणि आईने सांगितल्यानुसार एक निबंध लिहिला. ‘ह्रदयाच्या मखमली पेटीत जपून ठेवावीत
अशी दोनच अक्षरं आहेत. एक आहे आ, आणि दुसरे ई’; अशी झोकदार सुरवात. पुढे
मातृप्रेमाचं मंगल, नव्हे नव्हे, महन्मंगल स्तोत्र, तिनी समुद्राची शाई आणि आभाळाचा कागद वगैरे करून खरडलं होतं. पण ही
बोरूबहाद्दूरी मात्र असफल झाली. बक्षीस मिळालं दुसऱ्याच मुलीला. वर त्या दुसऱ्या
मुलीचा हृदयद्रावक निबंध वर्गात
शिक्षकांनी जाहीर वाचूनही दाखवला. तो निबंध ऐकून मुली ढसाढसा रडल्या वगैरे. घरी
येताच आईनी निबंध स्पर्धेची चौकशी केली आणि नलूनी प्रामाणिकपणे घडलेली घटना
सांगितली. नलूची आई ही आदर्श पालक
असल्यानं तिला हा प्रकार भयंकर झोंबला. नलूचे डोळे लाल लाल झालेत, ते हुकलेल्या
बक्षिसामुळे नाही, तर बक्षीसविजेत्या निबंधाच्या हृदयस्पर्शी वाचनामुळे; ही गोष्ट तर त्या माउलीला जाम
खटकली. ती नलूला म्हणाली, ‘तिनी बघ कसा छान निबंध लिहिला, नाही तर तू!’ यावर नलूनं
शांतपणे खुलासा केला, ‘अगं तिची आई दहाच दिवसापूर्वी वारली, त्यामुळे तीच्या
सगळ्या आठवणी लिहिल्या तिनी. तू तर अजून....!!’ हा खुलासा ऐकून नलूच्या आईला
मेल्याहून मेल्यासारखं झालं.
एकूणच शाळेत आमच्या गप्पातल्या
माणसांनी बराच धुडगूस घातला आहे. शिक्षक दिनासाठी राधाकृष्णन् यांच्या ऐवजी चक्क
राधा-कृष्णाची तसबीर आणणारा शिपाई मला माहित आहे आणि ‘झेंडूची फुले’ हे पुस्तक
वनस्पतीशास्त्राच्या कप्प्यात ठेवणारा ग्रंथपालही! या न्यायानी ‘शामची आई’ त्यानी
लपवूनंच ठेवलं असतं; कारण शाळेच्या ग्रंथालयात प्रसूतीशास्त्राचा कप्पा कुठे असतो?
‘पहिल्या धड्यातील आठ ते दहा ओळी लिहून आणा’, असा गृहपाठ दिल्यावर
समीरनी आठव्या ओळीपासून मोजून दहाव्या ओळीपर्यंतच मजकूर लिहीला होता.
‘एवढी खाडाखोड का करतोस?’,
असं विचारल्यावर मोहितचं उत्तर होतं, ‘...पण माझ्याकडे खोडरबर आहे ना?’
आठवीतही आईच्या कडेवर
बसणारा रत्नाबाईचा सदू होता एक. तिला अगदी उतार वयात झालेला हा एकुलता एक मुलगा.
त्याला कुठे ठेवू आणि कुठे नको असं
रत्नाबाईला व्हायचं. त्यामुळे ती त्याला कुठे ठेवायचीच नाही. चांगला मोठा लंबूटांग्या
झाला तरी सदू आपला रत्नाबाईच्या कडेवर. कडेवर घे असं म्हणणाऱ्या मोठया मुलाला
नेहमी ‘तू काही रत्नाबाईचा सदू आहेस का?’ असा प्रश्न असायचा.
रत्नाबाईच्या सदू सारखा
कायम बाल राहिलेला दुसरा मुलगा म्हणजे, ‘अलगद रानडे’. रानडे हे शेंडेफळ अर्थात
जबाबदारी कधीच कसली नाही, बाप होता तंवर बाप सगळं बघायचा. दुकान, घर वगैरे. पुढे
बाप गेल्यावर थोरला भाऊ, जो खूपच थोरला होता, तो ओघानंच सगळं बघायला लागला. दुकान,
घर वगैरे. ह्याला कधी काही करावं लागलं नाही की कशात लक्ष घालावं लागलं नाही.
आयुष्यभर हा आपला दुसऱ्याच्या छत्राखाली सुखेनैव वाढला. ह्याला कसली तोशीश पडली नाही,
कसला बरा वाईट निर्णय घ्यायची वेळ आली नाही की कसली जबाबदारी घ्यावी लागली नाही.
आयुष्यात हा अलगद आला आणि अलगद गेला. म्हणून हा अलगद रानडे! सुखी जीव.
या उलट मध्यप्रदेशच्या
कुठल्या संस्थानाची राजकन्या. लग्नानंतर झाली एका सरदार घराण्याची सून. पुढे
काळाच्या ओघात सरदार गेले, सरदारकीही गेली. घर फिरले, वासे फिरले; सुंभ जळला
पिळसुद्धा जळला. कुबेराच्या घरधनीणीला, संधीवातानी वेड्यावाकड्या झालेल्या हातानी,
देवळात वाती विकायची वेळ आली.
एक पाककौशल्य निपुण मोदक
आजी होत्या. मोदक ही ह्यांची स्पेश्यालिटी. मोदक अगदी शुभ्र-सफेद-पांढरे, अगदी
साच्यातून काढल्यासारखे, एकसारखे. पण त्या जे जे करतील ते ते अलौकिक चव घेऊनच
पुढ्यात यायचं. ह्यांचे लाडू कधी बसले नाहीत, सामोसे कधी हसले नाहीत; ह्यांच्या
वड्यांचे पतंग कधी कोन चुकले नाहीत आणि बिननळीची चकली कधी ह्यांच्या कढई बाहेर आली
नाही. गुळाच्या पोळ्या अगदी खुसखुशीत, तूपही रवाळ. जास्त वर्णन करत नाही, माझ्याच
तोंडाला पाणी सुटायला लागलं आहे. एका वाक्यात सांगायचं तर मोदक आजींचा श्राद्धाचा
स्वयंपाकही स्वर्गीय आनंद देऊन जायचा. स्वर्गामध्ये नर्तक आहेत, वादक आहेत, अप्सरा
आहेत अगदी डॉक्टर सुद्धा आहेत म्हणे, पण स्वयंपाकी? बल्लवाचार्य? आमच्या सगळ्यांची
खात्रीच होती की मोदक आजी ही स्वर्गातली अन्नपूर्णाच. मोदक आजींकडे जेवायचं म्हणजे
मोठा बाका समरप्रसंगच तो. ‘मला खा, मला खा’, असं प्रत्येक पदार्थ जणू आर्जवं करत
असायचा. ताटाची डावी विरुद्ध उजवी बाजू, असं युद्ध पेटायचं जणू. साधी चिंचेची चटणी, पण जिभेवर टेकवली की ते
टेसदार रसायन पचवायला, सर्व पाचकरस उचंबळून यायचे. शिवाय दुसऱ्या दिवशी और मझा.
शिळा भात, शिळं पिठलं, आंबट ताक, नासलेलं दूध असं काय काय म्हणजे त्याचं रॉ
मटेरिअल असायचं आणि यातून काय काय पाक सिद्धी साधली जायची.
मोदक आजींकडे कुठलाही जिन्नस
वाया म्हणून जाणार नाही. कोथींबीरीची देठंसुद्धा दोऱ्यानी बांधून, त्यांची जुडी
आमटीत सोडणार आणि वाढायच्या आधी काढून घेणार. वेलदोड्याची सालं केरात कधी जाणार
नाहीत, जाणार ती थेट कॉफीच्या बाटलीत. कॉफीत आपला दरवळ मिसळल्यावरच त्या सालांचं
निर्माल्य होणार.
वय वाढलं आणि मोदक आजींचा
पाकशास्त्रावरचा आणि आमच्यावरचाही ताबा सुटला. मोदक आजी पदार्थात मीठ वगैरे चक्क
विसरायला लागल्या. आमच्या जिभांना बाहेरच्या चहाटळ चवींनी ग्रासलं. बसल्या बैठकीला
फस्त होणाऱ्या आजींच्या वडया, चार चार दिवस पडून राहू लागल्या. त्या बिचाऱ्या राब
राब राबून करत रहायच्या. त्यांच्याकडे दुसरं होतं काय? सुरकुतल्या हातांनी,
थरथरत्या बोटांनी, त्या गव्हले करायला बसल्या. चार दिवसांच्या अथक परिश्रमानंतर,
बरीचशी सांडामांड आणि शिवाशिव झाल्यावर, काळे बेंद्रे, वेडेवाकडे गव्हले एकदाचे
तयार झाले. मोदक आजींचा दारुण पराभव त्या गव्हल्याच्या दाण्यादाण्यावर कोरला होता.
‘दाने दाने पे लिखा है खानेवाले
का नाम’, तसंच ‘गप्पा गप्पा पे लिखा है गप्पा में आनेवाले का नाम’. गप्पातला माणूस
व्हायचं भाग्य कुणालाही लाभत नाही. ...परंतू तेथे पाहिजे जातीचे, येऱ्या गबाळ्याचे
काम नोहे!
मलाही आवडेल गप्पातला माणूस
व्हायला. पण ते भाग्य नसणार माझ्या भाळी. मी काही अगदीच बुळा, अगदीच खुळा किंवा
अगदीच अवली नाही. कर्तृत्व यथातथाच आणि फारशी फजीतीही वाट्याला आलेली नाही.
त्यामुळे मुळे वारसाहक्कानी आलेली ही किश्यांची दागिन्यांची पेटी मी आपला पुढे पोहोचवणार.
त्या पेटीत मला स्थान मिळणं कठीणच.
एकूणच मी बघितलं, कौटुंबिक
गप्पात उत्कर्षापेक्षा घरोघरीच्या अपकर्षाच्या गप्पा फार. हळहळणे, चुकचुकणे हे
प्रिय. ‘ह्यां’च्या पेक्षा आपण किती सुखी, किती बरे, ही खूप खूप मनभावन भावना. आमच्या
गोतावळ्यात अगदी लख्ख उजेड पडेल असे दिवे बहुतेक कोणी लावलेच नाहीत. लावले असतील
तर ते मोकळेपणानं कौतुकायची आमची मानसिकता नाही. आम्ही पिग्मीच आहोत. मग
आमच्यापेक्षाही बुटक्या अशा लीलीपुटांच्या स्टोऱ्या आम्हाला रमवतात. लीलीपुट नाही
सापडले तिथे आम्ही ‘टॉम थंब’ शोधले, पण मान ऊंच करून वर क्वचितच पाहिलं. त्यामुळे
या गप्पात गमती जमती असतात, कारुण्यभानही असतं, पण कर्तृत्वाचं कवतिक? ते क्वचितच
असतं. अर्थात आमच्या गोतावळ्यात हे कोणी वाचलं, तर ते कुणालाही पटणार नाही.
वर असं-असं म्हणणारा एक जण
होता, असं म्हणत माझाच एक गप्पातला माणूस बनेल आणि पिढ्यानपिढ्या माझाही किस्सा
वारसा हक्कानं दिला जाईल. गप्पातला माणूस बनण्याची माझी महत्वाकांक्षा अशा रीतीनं
सुफळ संपूर्ण होईल.
या आणि अशाच लेखांसाठी माझा ब्लॉग जरूर वाचा.
shantanuabhyankar.blogspot.in